पुणे : तर बिनविरोध करणार का : पालकमंत्री चंद्रकांत पाटील | पुढारी

पुणे : तर बिनविरोध करणार का : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे; पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पक्षाने दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यास कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करणार का़? असा सवाल उच्च तंत्रशिक्षणमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केला आहे.

कसबा पेठेतील भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कसबा गणपती मंदिरासमोर भाजपकडून शक्तिप्रदर्शन करण्यात आले, त्या वेळी चंद्रकांत पाटील बोलत होते. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय (आठवले गट) यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यावरून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यावर विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, महाविकास आघाडीला कसबा पेठ पोटनिवडणूक बिनविरोध करायची नाही. त्यामुळे टिळकांचे नाव वापरत आहेत. माझे नाना पटोलेंना आव्हान आहे की, जर टिळक कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली तर बिनविरोध करणार का? असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

भाजपने मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी नाकारली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईला अर्थ उरलेला नाही, अशी टीका नाना पटोलेंनी केली होती. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘महाविकास आघाडीचे एकमत होत नाही. चिंचवड मतदारसंघात उमेदवारी लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबात दिली आहे. त्यामुळे चिंचवडमध्ये बिनविरोध निवडणूक होणार, असे घोषित करून टाका.’

दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी न दिल्याने ब—ाह्मण समाज नाराज झाल्याची कसबा मतदारसंघात चर्चा सुरू आहे. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, समज आणि वस्तुस्थिती, हे दोन वेगळे शब्द आहेत. समज निर्माण करायला फ्लेक्स लागतात. वस्तुस्थिती निर्माण करण्यासाठी काम करावे लागते. आम्ही काम केले आहे आणि या कामाची ब—ाह्मण समाजाला जाणीव आहे. भाजपने कोणावर कधीही अन्याय केला नाही.

शैलेश टिळक यांनी पदयात्रेत येणे टाळले
भाजपने कसबा मतदारसंघात हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. सोमवारी शक्तिप्रदर्शन करीत रासने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, या सगळ्या पदयात्रेत शैलेश टिळक यांनी उपस्थित राहणे टाळले, त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून, भाजप आणि गणेश मंडळांचा कार्यकर्ता म्हणून काम करताना मोठा अनुभव आहे. हजारो कार्यकर्त्यांवर आमचा विश्वास आहे.

कार्यकर्त्यांचा उत्साह हाच आमचा आत्मविश्वास असून, पक्षातील परिवार, संघटन हेच पक्षाचे बळ आहे. वरिष्ठ पातळीवर जो निर्णय घेतला जाईल, तो मला मान्य असेल. सध्या भाजपमध्ये कोणी नाराज नाही. कोणी उद्योग केले ते माहीत नाही. केलेल्या कामाच्या जोरावर आम्ही लोकांपर्यंत जाणार आहोत.

     – हेमंत रासने, भाजप उमेदवार, कसबा विधानसभा मतदारसंघ

Back to top button