पुणे : वेळ आहे, उमेदवार बदलता येईल : चंद्रशेखर बावनकुळे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : वेळ आहे, उमेदवार बदलता येईल, असे सूचक विधान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या म्हणण्यानुसार पक्ष विचार करेल, असे बावनकुळे म्हणाले. मुक्ता टिळक हयात असत्या तर प्रश्नच नव्हता. कोणी कोणाला डावलत नाही. ब्राह्मण समाजाने भाजपसाठी आयुष्य दिले आहे.
पक्षाने ब्राह्मण समाजाला न्याय दिला आहे आणि ब्राह्मण समाजानेही खूप काही दिले आहे. महाविकास आघाडीने कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पाठिंबा दिला, तर उमेदवार बदलण्याचा विचार करण्यात येईल, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शैलेश टिळक यांची घरी जाऊन भेट घेतली.
त्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, कोणालाही डावलण्याचा प्रश्न येत नाही. रासने यांना उमेदवारी दिली, त्या वेळी टिळक यांना उमेदवारी दिल्यास बिनविरोध करू, असे काँग्रेस नेत्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत आहे. ही निवडणूक बिनविरोध झाल्यास मी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे आभार मानेन. आमचा बी फार्म तयार आहे. कोणाचीही नाराजी नाही, कोणीही याबाबत काही म्हटलेले नाही. काही जण जाणीवपूर्वक हे उद्योग करत आहेत. निवडणूक झाल्यास 51 टक्के मते घेऊन आमचा विजय होईल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.