पुणे : भाजप ब्राह्मण समाजाला गृहीत धरतोय का? | पुढारी

पुणे : भाजप ब्राह्मण समाजाला गृहीत धरतोय का?

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ब्राह्मण समाज सर्वच निवडणुकांमध्ये भाजपच्या मागे खंबीरपणे उभा असतो. मात्र, शहरातील आठपैकी एकाही मतदारसंघात समाजाचा उमेदवार दिला नाही. कदाचित, ते समाजाला गृहीत धरत नसतील, असे मत काँग्रेस नेते रोहित टिळक यांनी व्यक्त केले. तसेच, भाजपने टिळक कुटुंबात उमेदवारी द्यायला हवी होती, असेही ते म्हणाले. केसरीवाडा येथे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, अपुरी कामे पूर्ण करण्यासाठी भाजपने टिळक कुटुंबात उमेदवारी देणे गरजेचे आहे.

कोणतीही निवडणूक असो ब्राह्मण समाज भाजपच्या मागे उभा राहतो. असे असताना शहरातील एकाही विधानसभा मतदारसंघात ब्राह्मण समाजाचा लोकप्रतिनिधी नाही. त्यामुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. या नाराजीचा फटका भाजपला कसबा पेठ पोटनिवडणुकीत बसेल आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे निवडून येतील.

घरामध्ये अशी घटना घडल्याने आपण उमेदवारी घ्यायची नाही आणि मागायचीही नाही, असे मी ठरविले होते. भाजपकडून घरात उमेदवारी देण्याची चर्चा होती, त्यामुळे मी उमेदवारी मागणे योग्य होणार नव्हते. कालही मला उमेदवारीसंदर्भात विचारणा झाली होती. मात्र, मी स्पष्टपणे नकार दिल्याचे रोहित टिळक यांनी सांगितले. भाजपने टिळक घराण्यातील उमेदवार दिलेला नसताना राज ठाकरेंचा
बिनविरोधासाठी हट्ट का आहे? हे सांगता येत नसल्याचेही ते म्हणाले.

Back to top button