आळंदी : रस्त्यांवर लग्नात ’झिंग झिंग झिंगाट’; मिरवणुका जोरात अन् सामान्य कोमात

श्रीकांत बोरावके
आळंदी : काही वर्षांपूर्वी आळंदीच्या रस्त्यावर लग्न मिरवणुकांना बंदी घालण्यात आल्याच्या पोलिस प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचा सध्या आळंदी पोलिसांनाच विसर पडला की काय? असे चित्र सध्या शहरातील रस्त्यांवर दिसून येत आहे. आळंदी शहराच्या रस्त्यांवर धडाक्यात मिरवणुका सुरू आहेत. त्यावर कुठलीही कारवाई होत नसल्याने सामान्य नागरिक मात्र नाराजी व्यक्त करीत आहेत. वाहतूक पोलिस करतात काय? हा सर्वांनाच प्रश्न पडला आहे. कारण, केवळ वाहनचालकांवर कारवाई करीत ऑनलाइन फाइन टाकले जात आहे. मात्र, रस्त्यांवर दिमाखात नवरदेवांच्या मिरवणुका निघत असताना त्यावर कुठलीच कारवाई होत नाही, हे वास्तव आहे.
आळंदी शहर हे राज्यातील सर्वाधिक विवाह संस्था असलेले आणि लग्नासाठी सर्वाधिक पसंती दर्शविले जाणारे आहे. शहरातील मंगल कार्यालये, धर्मशाळेत दररोज शेकडो लग्न लागतात. या लग्न मुहूर्तावेळी नवरदेवाची परण्या मिरवणूक ही शहराच्या रस्त्यांवर निघून वाहतूक कोंडीत भर पडत होती. यावर उपाययोजना म्हणून रस्त्यावर वाजतगाजत मिरवणूक काढण्यावर काही वर्षांपूर्वी पोलिसांनी बंदी घातली. परण्या मिरवणूक ही कार्यालयाच्या आवारातच काढली जावी, अशी सूचना होती.
रस्त्यावर मिरवणूक काढणार्यांवर कारवाई केली जात होती. अगदी अलीकडे कोरोनापर्यंत शहरात या बंदीचे पालन होताना दिसून येत होते. मात्र, कोरोनानंतर विवाहसोहळे पुन्हा सुरू झाले आणि मिरवणुका देखील परण्यासहित निघू लागल्या. मिरवणुकीत घोडा, वाजंत्री, बँजो असे जवळपास 100 लोक असतात. ते रस्त्यावर आले की वाहतूक कोंडी होते. यामुळे या मिरवणुका काढण्यास घालण्यात आलेली बंदीच चांगली होती व पुन्हा तिचे सक्त पालन केले जावे, असा सूर नागरिकांमधून उमटत आहे.
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
शहरात वाहतूक कोंडी कळीचा मुद्दा बनली आहे. रस्ते मोठे होऊन देखील वाहतूक कोंडी होत असेल, तर नक्की वाहतूक विभाग आणि आळंदी पोलिस प्रशासन कोणत्या उपाययोजना करते तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काय करते? हा प्रश्न उपस्थित होत आहे.