खडकी, शिवाजीनगर, हडपसर स्थानकांवरून पर्यायी रेल्वेसेवा | पुढारी

खडकी, शिवाजीनगर, हडपसर स्थानकांवरून पर्यायी रेल्वेसेवा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शिवाजीनगर रेल्वे स्टेशन येथून ‘पुणे शिवाजीनगर-तळेगाव-लोणावळा लोकल सेवा’ सोमवारी (दि.6) सुरू करण्यात आली. या सेवेचे खासदार गिरीश बापट यांनी ऑनलाइन उपस्थित राहून उद्घाटन केले. त्या वेळी बापट यांनी खडकी, शिवाजीनगर, हडपसर, रेल्वे स्थानकावरून आणखी पर्यायी रेल्वे सेवा सुरू करणार असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमानिमित्त आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार सुनील कांबळे, गौरव बापट व इतर पदाधिकारी तसेच रेल्वेचे अधिकारी शिवाजीनगर रेल्वे स्थानक येथे प्रत्यक्ष उपस्थित होते. बापट यांनी सांगितले की, पुणे शहरासह उपनगरेही झपाट्याने विकसित होत असून, नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले केवळ पुणे रेल्वे स्टेशन आहे.

त्यामुळे सध्या या स्टेशनवर प्रचंड ताण येत असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी, रेल्वे व पोलिस प्रशासनावर ताण, तसेच नागरिकांना वेळेवर इच्छित स्थळी पोहचण्यास विलंब आणि आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. तसेच भविष्यातही पुणे स्टेशनवरील हा ताण असाच वाढत रहाणार असल्याने पुणे रेल्वे स्टेशनला शहरातच पर्यायी व्यवस्था म्हणून शहरातील खडकी, शिवाजीनगर, हडपसर ही रेल्वे स्थानके विकसित करून या स्थानकावरून नवीन पर्यायी रेल्वेसेवा सुरू कराव्यात, अशी माझी सातत्याने आग्रहाची मागणी होती. यासंदर्भात मी संसदेतही अनेक वेळा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे शिवाजीनगर रेल्वे फलाटाचे रुंदीकरण व नवीन लोकल रेल्वे सेवेचे उद्घाटन करताना मला आनंद होत आहे.

आणखी चार सेवा सुरू करणार
शिवाजीनगर स्टेशनवरून तळेगाव-लोणावळा लोकल सेवा सुरू करण्यात आली असून, येत्या काही दिवसांत अजून 4 नवीन रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार आहेत. तसेच, स्टेशनवर प्रवाशांच्या सुविधेसाठी पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था, प्लॅटफॉर्म निवारा, टॉयलेट ब्लॉक, लायटिंग, पंखे, फूट ओव्हर ब्रिज, वॉटर कुलर, घड्याळ, डस्टबिन, पीएएस, ट्रेन इंडिकेटर बोर्ड व इतर सुविधेसह प्लॅटफॉर्मच्या विस्ताराचे काम करण्यात आले आहे.

Back to top button