मोठी बातमी : पुणे-नाशिक रेल्वेमार्गाला मान्यता | पुढारी

मोठी बातमी : पुणे-नाशिक रेल्वेमार्गाला मान्यता

पुणे; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय रेल्वे बोर्डाने मंजूर केलेल्या पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाला रविवारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे, ही माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत असलेली मागणी मान्य झाल्याबद्दल फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला असून, ट्विट करून रेल्वेमंत्र्यांना विशेष धन्यवाद दिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या रेल्वेसाठी 13 हजार 539 कोटी रुपयांच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्याबद्दल महाराष्ट्राच्या वतीने आपण रेल्वेमंत्री वैष्णव यांचे आभार मानतो, असे फडणवीस म्हणाले. पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांना जोडणारा प्रकल्प म्हणून पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाकडे पाहिले जाते.

या प्रकल्पामुळे आता तीन जिल्हे एकमेकांना जोडले जाणार आहेत. त्याशिवाय या भागातील प्रवाशांना ये-जा करणे सोयीचे ठरणार आहे; तसेच या भागांतील उद्योगाच्या दृष्टीनेदेखील हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. पुणे-नाशिक हा प्रवास या प्रकल्पानंतर अत्यंत सुलभ होणार आहे. गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेची मागणी केली जात होती.

या प्रकल्पासाठी आवश्यक 1450 हेक्टर जागेपैकी 30 हेक्टरहून अधिक खासगी जागा संपादित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या सूत्रांनी दिली. सरकारी आणि वन जमीन संपादन करण्याची प्रक्रियादेखील सध्या सुरू आहे. नाशिक ते पुणे असा थेट मार्ग सध्या नसल्यामुळे या प्रवासाकरिता सहा तासाहून अधिक वेळ लागतो. मात्र, आता या मार्गानंतर प्रवाशांबरोबरच शेतकर्‍यांचीही चांगली सोय होणार आहे. त्यांना आपल्या शेतमालाची ने-आण करणे अधिक सुलभ होईल.

पुणे-नाशिक या हायस्पीड प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यामुळे आता प्रवाशांचा किमान तीन ते चार तास वेळ वाचणार असून, याचे मी मनापासून स्वागत करतो. नाशिकच्या विकासाची दारे याद्वारे खुली होतील.
                                                      – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

Back to top button