पुणे : वाजेघर, वांगणी, शिवगंगाला प्राधान्य द्या ; गुंजवणी पाणी संघर्ष समितीची मागणी

नसरापूर : पुढारी वृत्तसेवा : गुंजवणी प्रकल्पातून केवळ पुरंदर तालुक्याच्या पाणी प्रकल्पाला प्राधान्य दिले जात आहे. भोर व वेल्हा तालुक्यातील वाजेघर, वांगणी, शिवगंगा या उपसासिंचन योजनाकडे दुर्लक्ष केले जात आहे. ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा आमदार संग्राम थोपटे व गुंजवणी पाणी संघर्ष समितीने दिला. त्यानंतर प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यता अहवालामध्ये लवकरच या योजनांना मान्यता देण्यात येईल, अशी ग्वाही अधिकार्यांनी दिली. आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंचन भवन, पुणे येथे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्या समवेत गुंजवणी पाणी संघर्ष समितीची बैठक पार पडली.
या वेळी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एच व्ही. गुणाले, पाटबंधारे प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे, निरा देवघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनकर धरपाळे, सचिव अरविंद सोंडकर, शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, अमोल पांगारे, माजी सभापती लहूनाना शेलार, संपतदादा आंबवले, नाना राऊत, दिगंबर चोरघे, शिवाजी चोरघे आदी उपस्थित होते. या बैठकीत उपसासिंचन योजनेबाबत सादरीकरण व माहिती देण्यात आली. काही गावांतील अतिरिक्त क्षेत्र या योजनांमध्ये समावेश करण्याबाबत संघर्ष समितीच्या वतीने आग्रही मागणी करण्यात आली. तांत्रिकदृष्ट्या शक्य असणारे सर्व क्षेत्र या योजनांमध्ये समाविष्ट करण्याचे तसेच गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यता अहवालामध्ये येत्या तीन ते चार महिन्यांत मान्यता देण्यात येईल, असे आश्वासन या वेळी देण्यात आले.
तीन महिने काम बंद ठेवा : आमदार थोपटे
बैठकीत वाजेघर, वांगणी, शिवगंगा या उपसासिंचन योजनांमुळे अधिकार्यांनी तीन ते चार महिन्यांत मान्यता देण्यात येईल, असे सांगितल्यानंतर आमदार संग्राम थोपटे यांनी तोपर्यंत येथील काम थांबवा व उर्वरित पुढील टप्प्यातील कामे सुरू ठेवा, असे अधिकार्यांना सुनावले.