

मोशी; पुढारी वृत्तसेवा : सोसायटीसमोरील रस्त्यावर दुभाजकात लावलेली झाडे छाटणी करावी त्याला पाणी घालावे, अशी वांरवार विनंती करून देखील दुर्लक्ष करणार्या पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या अधिकार्यांना कंटाळून अखेर स्थानिकांनीच स्वखर्चाने वृक्ष छाटणी करत झाडांना पाणी घालण्याचा प्रकार मोशीत घडला आहे.
स्थानिकांना स्वतःच जर अशी कामे स्वखर्चाने करावी लागत असतील तरी पालिका का आणि कशासाठी आहे असा सवाल उपस्थित होत आहे शिवाय नागरिकांचा कर देखील नक्की आणि कशासाठी घेते असा भाबडा प्रश्न उपस्थित होत आहे. मोशी-आळंदी रस्त्यावर ऑस्टिया सोसायटीकडे जाण्यासाठी शंभरी फुटी रस्ता पालिकेकडून बनविण्यात आला आहे.
येथील दुभाजकामध्ये झाडे लावत सुशोभीकरण करण्यात आले आहे. मात्र, अनेक दिवस होऊन देखील त्याची ना योग्य छाटणी करण्यात आली ना त्याला पाणी घालण्यात आले. अखेर पालिकेच्या कारभाराला वैतागून येथील सामाजिक कार्यकर्ते दयानंद सस्ते यांनी स्वतःच स्वखर्चाने वृक्षछाटणी व झाडांना पाणी घालून घेतले.
याबाबत दयानंद सस्ते यांनी सांगितले की, पालिका अधिकारी आज करतो उद्या करतो, असे आश्वासने देत असतात,एकीकडे झाडे लावा झाडे जगवा, असे संदेश दिले जातात आणि दुसरीकडे लावलेली झाडे देखील जगवली जात नाही असे चित्र आहे.वरिष्ठ अधिकार्यांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई करणे गरजेचे आहे. एकंदरीतच महानगरपालिका प्रशासकाकडे गेल्यानंतर कारभारात फरक पडला असून किरकोळ कामांकडे देखील अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.आळंदी रस्त्यावरील झाडांची देखील हीच अवस्था आहे.