बारामती : शिंदे सरकारकडून सात महिन्यांत जाहिरातींवर 42 कोटींचा खर्च ; माहिती अधिकारातून बाब उघड | पुढारी

बारामती : शिंदे सरकारकडून सात महिन्यांत जाहिरातींवर 42 कोटींचा खर्च ; माहिती अधिकारातून बाब उघड

बारामती : पुढारी वृत्तसेवा : राज्यात सत्तांतरानंतर कारभार हाती घेतलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने गेल्या सात महिन्यांत जाहिरांतीसाठी शासकीय तिजोरीतून तब्बल 42 कोटी 44 लाख रुपयांचा खर्च केला आहे. करंजेपूल (ता. बारामती) येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी याबाबत माहिती अधिकारात माहिती विचारली होती.
नुकतीच राज्य शासनाकडून ही माहिती देण्यात आली.

यामध्ये जाहिरात खर्चाची सरासरी काढली, तर दिवसाला जवळपास 19 लाख 74 हजार रुपये जनतेच्या खिशातल्या शासकीय पैशाची उधळपट्टी केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशातून शासनास जाणार्‍या या पैशांच्या खर्चावर शासन आतातरी अंकुश लावेल का व जाहिरातबाज सरकार फक्त जाहिरातबाजी न करता प्रसिद्धीचा हव्यास सोडून खरोखरच राज्याच्या विकासासाठी काम करेल का, हा प्रश्न यादव यांनी उपस्थित केला आहे. सध्याच्या सरकारने जाहिरातींवर वारेमाप खर्च चालवला आहे. विकासाच्या नावाखाली डंका वाजवायचा, मात्र सर्वसामान्य जनतेच्या पैशाची उधळण करायची, असाच हा उद्योग सध्याचे सरकार करत असल्याचे यावरून स्पष्ट झाल्याचे यादव म्हणाले.

 

Back to top button