पुणे : ऊसतोड सुरू असताना दोन बिबट्यांचे दर्शन ; काम सोडून मजुरांनी काढला पळ

मंचर : पुढारी वृत्तसेवा : शेतामध्ये ऊसतोडणी सुरू असताना अचानक दोन बिबटे दिसल्याने मजुरांनी भीतीपोटी काम अर्धवट सोडून पळ काढला. परिणामी, परिसरातील ऊसतोड पूर्णपणे थांबली आहे. आंबेगाव तालुक्यातील चांडोली खुर्द येथील खालचा मळ्यात रविवारी (दि.5) दुपारी ही घटना घडली. खालचा मळा येथील शेतकरी ज्ञानेश्वर इंदोरे यांची ऊसतोड सुरू आहे. रविवारी सकाळी मजूर शेतात कामासाठी आले. त्यांनी काही ऊसतोडलादेखील.
परंतु अचानक बिबट्यांच्या गुरगुरण्याचा आवाज आल्याने मजूर घाबरले. त्यानंतर काही वेळाने दोन बिबटे समोरच दिसले. बिबट्यांना पाहताच मजुरांनी ऊसतोड थांबवून शेताबाहेर पळ काढला. या घटनेमुळे परिसरातील ऊसतोडणीचे काम पूर्णपणे ठप्प झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणपतराव इंदोरे यांना शेतकरी ज्ञानेश्वरी इंदोरे यांनी मोबाईलवरून संपर्क करून बिबट्यांबद्दल माहिती दिली. त्यानुसार इंदोरे यांनी वन विभागाला याबाबत कळवले. वनरक्षक प्रदीप औटी, वनमजूर जालिंदर थोरात, किसन पोखरकर यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. या वेळी बिबट्यांच्या पायांचे ठसे आढळून आले. नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन वन कर्मचार्यांनी केले आहे. तर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी येथे पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.