पुणे : निमोण्यात वृध्दाचा खून ; उसाच्या शेतात आढळला विवस्त्रावस्थेतील मृतदेह | पुढारी

पुणे : निमोण्यात वृध्दाचा खून ; उसाच्या शेतात आढळला विवस्त्रावस्थेतील मृतदेह

निमोणे : पुढारी वृत्तसेवा : निमोणे (ता. शिरूर) येथील मोटेवाडी रस्त्यालगतच्या उसाच्या शेतात 72 वर्षीय व्यक्तीचा खून करण्यात आला. मनोहर चंदरराव शितोळे (रा. सांगवी सांडस, ता. हवेली) असे त्याचे नाव आहे. मोटेवाडी – निमोणे रस्त्याच्या कडेला शनिवारी (दि. 4) सकाळी अकराच्या दरम्यान शाळकरी मुलांना माजी सरपंच नानासाहेब काळे यांच्या उसाच्या शेतात विवस्त्र मृतदेह दिसला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पाटील इंदिरा जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच घटनेची माहिती शिरूरचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना दिली.

उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी, पोलिस निरीक्षक राऊत, उपनिरीक्षक एकनाथ पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहावर मारहाणीच्या खुणा होत्या. तब्बल चार तास पोलिस पथक गावात तळ ठोकून होते. परंतु, मृत व्यक्तीची ओळख पटली नाही. पोलिसांना मृतदेहाच्या जवळ कपडे मिळाले. त्यावरून त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली. ज्या व्यक्तीचा खून झाला आहे त्या व्यक्तीची मुलगी निमोणे गावात दिली आहे. बहीण, मेव्हुणीपण निमोण्यातच दिल्या आहेत. त्यांचा खूप मोठा गोतावळा निमोणे गावात असल्यामुळे अनेकदा शितोळे यांचा मुक्काम निमोणे गावातच असायचा, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.  दोन फेब—ुवारीला रात्री साडेआठनंतर ते कोणालाही दिसले नाहीत. मात्र, मोटेवाडी रस्त्याने जाणार्‍या शाळकरी मुलांना त्यांचा मृतदेह रस्त्यालगतच्या शेतात दिसला. खून नक्की कुणी केला याबाबत पोलिस तपास करीत आहेत. खुनाचा तपास करण्यासाठी पोलिस गावात ठाण मांडून आहेत.

Back to top button