‘मोशी’त कांदा, बटाटा, कोबीची आवक घटली | पुढारी

‘मोशी’त कांदा, बटाटा, कोबीची आवक घटली

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : मोशी उपबाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत रविवारी (दि. 5) कांदा, बटाटा, कोबी, फ्लॉवर यांची आवक घटली. तर, फ्लॉवर, दुधी भोपळा यांची आवक वाढल्याचे पाहण्यास मिळाले. पिंपरी भाजी मंडईमध्ये टोमॅटो आणि वाल यांची मोठी आवक झाली. तर, शेवगा, भेंडी आणि गवार यांची आवक कमी झाल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले. परिणामी, गवारच्या दरात किरकोळ बाजारात किलोमागे 10 ते 15 रुपयांची वाढ झाली. भेंडी सध्या प्रतिकिलो 70 रुपये या दराने विकली जात आहे.

मोशी उपबाजारात कांदा 261 क्विंटल, बटाटा – 350 क्विंटल इतकी आवक झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याची आवक 386 क्विंटलने कमी झाली. तर, बटाट्याची आवकदेखील 169 क्विंटलने घटली आहे. घाऊक बाजारात मटार, फ्लॉवर, कोबी यांची यांची आवकदेखील कमी झाली आहे. मटार – 175 क्विंटल, फ्लॉवर- 130 क्विंटल, कोबी – 168 क्विंटल इतकी आवक झाली आहे. मोशी उपबाजारात रविवारी 2 हजार 536 क्विंटल इतकी फळभाज्यांची आवक झाली. तर, 48 हजार 300 गड्ड्या पालेभाज्यांची आवक झाली.

गवारच्या दरामध्ये वाढ ः वाल, टोमॅटोच्या दरात घसरण
पिंपरी भाजी मंडईतील किरकोळ बाजारात भेंडीचे दर सध्या प्रति किलोमागे 70 रुपये इतके चढे आहेत. तर, गवारचे दर प्रति किलोमागे 110 ते 120 रुपयांपर्यंत जाऊन पोहचले आहेत. गवारच्या दरामध्ये प्रति किलोमागे 10 ते 15 रुपयांची वाढ झाली आहे. तुलनेत भेंडीचे दर मात्र स्थिर आहेत. किरकोळ बाजारामध्ये वाल आणि टोमॅटो यांची चांगली आवक झाल्याने त्यांच्या दरात घसरण झाली असल्याची माहिती भाजी विक्रेते सुनील कुदळे यांनी दिली. वालचे दर सध्या प्रति किलोमागे 50 रुपये इतके आहे. हे दर प्रति किलो 80 ते 90 रुपयांपर्यंत जाऊन पोहचले होते. टोमॅटोचे दर देखील 20 रुपये प्रति किलो होते. सध्या टोमॅटो प्रति किलो 14 ते 16 रुपये या दराने विकला जात आहे.

पालेभाज्यांचे दर नियंत्रणात
पालेभाज्यांचे दर सध्या काही प्रमाणात नियंत्रणात आहेत. पिंपरी येथील भाजी मंडईमध्ये कोथिंबीर, मुळा प्रति जुडी 15 ते 20 रुपयांना विकण्यात आली. तर, मेथी, कांदापात प्रति जुडी 20 रुपये या दराने विकली गेली. शेपू, पालक, हरभरा गड्डी, चवळी यांचा प्रति जुडी 10 रुपये असा भाव होता. तुलनेत पुदिन्याची जुडी 5 ते 10 रुपये होती.

पिंपरी भाजी मंडईतील फळभाज्यांचे दर (प्रति किलो)
कांदा 25
बटाटा 30
लसूण 70
आले 60
भेंडी 70
गवार 110-120
टोमॅटो 16
मटार 30-40
घेवडा 40
दोडका 60
दुधी भोपळा 30
काकडी 30
कारली 60
गाजर 30
फ्लॉवर 40
कोबी 20
वांगी 60
ढोबळी मिरची 60
तोंडली 50
घोसाळी 60
पावटा 70
वाल 50
रताळी 50
मिरची 50-60

पालेभाज्या (प्रति जुडी दर)
कोथिंबीर 15-20
मेथी 20
शेपू 10
कांदापात 20
पालक 10
मुळा 15-20
चवळी 10
हरभरा गड्डी 10
पुदिना 5-10

Back to top button