पिंपरी : थकबाकीदार महापालिकेच्या रडारवर | पुढारी

पिंपरी : थकबाकीदार महापालिकेच्या रडारवर

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या करसंकलन विभागाने वारंवार आवाहन करूनही मिळकतकराची थकबाकी न भरणार्‍या निवासी तसेच, विविध कंपन्या, संस्था, व्यावसायिक यांची नावे वृत्तपत्र व सोशल मीडियात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. चार वर्षापेक्षा जास्त काळापासून मूळ कराची थकबाकी एक लाखांपेक्षा अधिक आहे, अशांची नावे या यादीमध्ये असणार आहेत, असे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.

करसंकलन विभागाने वारंवार नोटीस देऊनही कर भरत नसलेल्या थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांच्याकडे चार वर्षांपासून मूळ मिळकतराची थकबाकी एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा मिळकतधारकांची नावे प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. प्रथम बिगरनिवासी मिळकतधारक म्हणजेच औद्योगिक, व्यावसायिक आदी प्रकारच्या मिळकतधारकांची नावे प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

आकडेवारीनुसार मागील चार वर्षांपासून थकबाकीदारांची संख्या 1 लाख 186 असून, त्यांच्याकडे तब्बल 305 कोटी 69 लाख 75 हजारांची थकबाकी आहे. त्यामध्ये निवासी मिळकतीची संख्या 84 हजार 557 असून त्यांच्याकडे थकबाकी 168 कोटी 48 लाख 8 हजार 143 रुपये आहे. बिगरनिवासी मिळकतीची संख्या 12 हजार 973 असून त्यांच्याकडे थकबाकी 87 कोटी 78 हजार 427 रुपये आहे. औद्योगिक मिळकतीची संख्या 392 असून त्यांच्याकडे थकबाकी 10 कोटी 57 लाख 67 हजार 339 आणि मोकळ्या भूखंडाची संख्या 2 हजार 222 असून त्यांच्याकडे थकबाकी 39 कोटी 54 लाख 16 हजार 829 इतकी आहे.

प्रतिसाद मिळत नसल्याने नावे प्रसिद्ध करणार
थकीत मिळकतकर वसुलीसाठी थकबाकीदारांना नोटीस देणे व जप्ती अशी कारवाई करण्यात येत आहे; परंतु मनुष्यबळाची मर्यादा पाहता प्रत्येक ठिकाणी जप्तीची कारवाई करणे शक्य नाही. त्यामुळे आता चार वर्षांपासून मिळकतकर भरण्यास टाळाटाळ करणार्‍यांची नावे वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.

टार्गेट पूर्ण करण्यासाठी नियमानुसार कारवाई
आर्थिक वर्ष 2022-23 चे मिळकतकर वसुलीचे उद्दिष्ट 1 हजार कोटी आहे. ते पूर्ण करण्यासाठी करसंकलन विभागाचे अधिकारी-कर्मचारी प्रयत्नशील आहेत. वारंवार नोटीस देऊनही काही मिळकतधारक बिल भरत नसल्यामुळे महापालिकेला कठोर भूमिका घ्यावी लागत आहे, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

Back to top button