पुणे : रस्त्याच्या कामाचा पर्यटकांना फटका | पुढारी

पुणे : रस्त्याच्या कामाचा पर्यटकांना फटका

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही महिन्यांपासून खडकवासला गावातील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम मंदगतीने सुरू आहे. त्याचा फटका पर्यटकांसह स्थानिकांना बसत आहे. खडकवासला गावाबाहेरून जाणार्‍या रस्त्यावर वाहने उभी केली जात आहे. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. धरणमाथ्यावरील रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले. मात्र, दोन्ही बाजूला काम अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी सुरू आहे. नांदेड फाटा ते पानशेत रस्त्याचे कामाची मुदत संपूनही गोर्‍हे बुद्रुक, खानापूरसह अनेक ठिकाणी पूल, रस्त्याची कामे अनेक महिन्यांपासून रखडली आहेत.

शनिवार, रविवार तसेच सुटीच्या दिवशी धरण, सिंहगड, पानशेतकडे जाणार्‍या पर्यटकांची खडकवासलात वर्दळ असते. गावातील रस्त्याचे काम सुरू असल्याने बाह्यवळण रस्त्यावरून वाहतूक वळविण्यात आली आहे. असे असले तरी निम्म्याहून अधिक वाहतूक गावातून सुरू आहे. यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पुरेसे पोलिस नाहीत. त्यामुळे काम सुरू असेपर्यंत बांधकाम विभागाने दोन्ही बाजूला सुरक्षारक्षक तैनात करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, रविवारी (दि. 4) खडकवासला धरण चौपाटी तसेच बाह्यवळण रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले.

काम लवकर पूर्ण करणार
खडकवासला गावातील रस्त्याचे काम टप्प्याटप्प्याने करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत. वाहतूककोंडी होऊ नये याची खबरदारी घेऊन काम लवकर
पूर्ण केले जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सांगण्यात आले.

Back to top button