पुणे : जिल्हा रुग्णालयातील डीईआयसीमध्ये चार हजार मुलांवर उपचार | पुढारी

पुणे : जिल्हा रुग्णालयातील डीईआयसीमध्ये चार हजार मुलांवर उपचार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जन्मजात व्यंग, जीवनसत्त्वांचा अभाव, शारीरिक आणि मानसिक विकासातील अडथळे, आजार अशा समस्यांचे लवकर निदान झाल्यास उपचारही तातडीने  करता येतात. औंध जिल्हा रुग्णालयातील डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेंशन सेंटरमध्ये गेल्या वर्षी 4000 मुलांवर उपचार करण्यात आले आहेत. बालकांच्या मानसिक आणि शारीरिक विकासामध्ये वाढ होण्यासाठी किंवा वाढ होत नसल्यास वेळेत निदान होण्यासाठी अर्ली इंटरव्हेंशन सेंटर प्रत्येक जिल्ह्यात उभारण्यात येत आहेत.

0 ते 18 वयोगटातील बालकांना जन्मत: असणारे आजार, जीवनसत्त्वांच्या अभावामुळे होणारे आजार, शारीरिक आणि बौध्दिक विकासात्मक वाढीतील आजार याबाबतच्या तपासण्या आणि उपचार तज्ज्ञांमार्फत केले जातात. बालरोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंतचिकित्सक, भौतिक उपचार तज्ज्ञ, व्यवसाय उपचार तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, श्रवण आणि वाचा दोष तज्ज्ञ, आहारतज्ज्ञ यांच्याकडून तपासण्या आणि उपचार केले जात आहेत. जिल्हा रुग्णालयात 6500 स्क्वेअर फुटांच्या जागेत सेंटर चालवले जात आहे. आर्थिक निम्नस्तरातील नागरिकांना बालकांवर अद्ययावत उपचार करून घेता यावेत, यासाठी मोफत सेवा देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.

मतिमंदत्व, गतिमंदत्व, स्वमग्नता, श्रवण आणि वाचा दोष अशा विविध समस्यांचे निदान झालेल्या बालकांवर डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेंशन सेंटरमध्ये उपचार केले जात आहेत. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये 12
हजारहून अधिक बालकांवर उपचार करण्यात आले आहेत. बालकांवरील उपचारांप्रमाणेच पालकांनाही मार्गदर्शन केले जात आहे.
          – डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, औंध जिल्हा रुग्णालय.

Back to top button