पुणे : पालखी मार्गावर दोन वेगवेगळे फलक ; वाहनचालकांची त्रेधातिरपीट | पुढारी

पुणे : पालखी मार्गावर दोन वेगवेगळे फलक ; वाहनचालकांची त्रेधातिरपीट

पुढारी वृत्तसेवा :  संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर बावडा-इंदापूर यादरम्यान गोखळीचा ओढा येथे दोन वेगवेगळ्या दिशादर्शक फलकांमुळे वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडत असल्याचे चित्र शुक्रवारी (दि. 3) पाहावयास मिळाले.  गोखळीचा ओढा येथे पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे पुलाच्या शेजारून जाणार्‍या जुन्या डांबरी रस्त्यावरून गुरुवार (दि. 2) पर्यंत वाहतूक सुरू होती. बावडाकडून इंदापूरला जाताना पुलाच्या अलीकडून उजव्या बाजूला जुन्या रस्त्यावर वळण्याची प्रवाशांना सवय झाली आहे.
या ठिकाणी जुन्या रस्त्याकडे वळण्याच्या ठिकाणी शुक्रवारी रस्ता बंद करून चक्क दोन वेगवेगळे दिशादर्शक वळणेचे वेगवेगळे बाण असलेले फलक आडवे लावण्यात आले आहेत.

त्यामुळे प्रवासी नेहमीच सवयीने जुन्या रस्त्याकडे वळताना अचानक दोन वेगवेगळे दिशादर्शक फलक दिसल्याने गोंधळून जात आहेत व गाडीचा वेग करून कमी करून थांबत आहेत. त्यानंतर परिस्थितीचा अंदाज घेऊन शुक्रवारी पुलावरून सुरू केलेल्या कच्च्या रस्त्यावरून जात आहेत.  या ठिकाणी उतार असल्याने पाठीमागून वाहने वेगात येत आहेत. त्यामुळे दोन वेगळे दिशादर्शक फलक पाहून गोंधळून जाऊन एखाद्याने वाहन उभे केल्यास अथवा वेग कमी केल्यास पाठीमागून वाहन धडकून अपघात होण्याची भीती दिवसभर निर्माण झाली होती. सध्या पालखी मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम सुरू असताना वाहनधारकांच्या सुरक्षेची काटेकोरपणे काळजी घेणे गरजेचे आहे. गोखळीचा ओढा येथे योग्य दिशादर्शक फलक लावण्याची मागणी प्रवाशांकडून केली
जात आहे.

Back to top button