भंडारा डोंगर मंदिर जीर्णोद्धाराचा पाच कोटींचा संकल्प पूर्ण | पुढारी

भंडारा डोंगर मंदिर जीर्णोद्धाराचा पाच कोटींचा संकल्प पूर्ण

तळेगाव दाभाडे; पुढारी वृत्तसेवा : श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथील संतश्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मंदिर जीर्णोद्धारासाठी हभप डॉ. पंकजमहाराज गावडे यांनी मागील आठ महिन्यांपूर्वी दानशूर भक्तांकडून देणगी स्वरूपात पाच कोटी जमा करून देण्याचा संकल्प केला होता. तो माघ शुद्ध दशमीच्या कीर्तनरुपी सेवेत पूर्णत्वास गेला आहे. वारकरी संप्रदायातील मान्यवर मंडळींनीदेखील याप्रमाणे मंदिर जीर्णोद्धारासाठी सहकार्य करून मंदिराच्या पूर्णत्वाच्या कामास मदत करावी, असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी संत तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष हभप साहेबराव काशीद यांनी केले आहे.

श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे माघ शुद्ध दशमी कार्यक्रमानंतर झालेल्या आढावा बैठकीत हभप काशीदमहाराज बोलत होते. या वेळी ट्रस्टचे सचिव जोपा पवार, विश्वस्त भिमाजी दाभाडे, भाजपचे तालुकाध्यक्ष् रवींद्र भेगडे, शिवाजीराव पवार, शिवाजी शेलार, निवृत्ती दाभाडे, रामभाऊ कराळे पाटील, शरद मोहिते, जगन्नाथ नाटक पाटील, माउली गाडे आदी उपस्थित होते. या वेळी हभप काशीद पाटील म्हणाले, की मंदिराचे 40 टक्के काम होत आलेले आहे. मंदिराच्या पूर्ण कामासाठी सुमारे 125 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मंदिराच्या बरोबर बाजूची गावे सुदवडी व येलवाडी येथील गायरान जमिनीची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

Back to top button