पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेचा पिंपरी चिंचवड शहरातील 27 हजार 199 जणांनी लाभ घेतला आहे. या योजनेनुसार त्यांनी छापील वीजबिलाऐवजी फक्त 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडला आहे. त्यामुळे त्यांची प्रतिबिल 10 रुपये याप्रमाणे वार्षिक 120 रुपयांची बचत होत आहे. योजनेत सहभागी ग्राहक संख्या लक्षात घेता एकूण 32 लाख 63 हजार 880 रुपयांची बचत झाली आहे. गो ग्रीन योजनेत पिंपरी-चिंचवड शहरात सांगवी उपविभागात सर्वाधिक 8319 ग्राहक सहभागी झाले आहेत. त्या खालोखाल आकुर्डी- 5164 आणि चिंचवड – 5342 ग्राहकांचा समावेश आहे.
काय आहे 'गो ग्रीन' योजना ?
महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेनुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात 10 रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक 120 रुपयांची बचत होत आहे. वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ते 'गो-ग्रीन'मधील ग्राहकांना 'ई-मेल'द्वारे पाठविण्यात येत आहे. सोबतच 'एसएमएस'द्वारेदेखील वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंटचा लाभ घेणे अधिक शक्य झाले आहे.
योजनेत कसे सहभागी व्हाल?
महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीजबिलावर छापलेल्या जीजीएन या 15 अंकी क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे किंवा महावितरण संकेतस्थळाच्या hrrqt://billing.mahadirbom.in/gogreen.p{h हि या लिंकवर जाऊन करावी.
याबाबतची अधिक माहितीwww.mahadirbom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 'गो-ग्रीन' योजनेत सहभागी झालेल्या वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ई-मेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील 11 महिन्यांची वीजबिले मूळ स्वरुपात उपलब्ध आहेत. आवश्यकतेप्रमाणे वीजग्राहकांना ते कधीही डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे.
'गो-ग्रीन' योजना ही काळाची गरज आहे. वीजग्राहकांनी या योजनेत सहभागी व्हावे. तसेच, पर्यावरण रक्षणात योगदान द्यावे.
-राजेंद्र पवार,
मुख्य अभियंता, महावितरण.