पिंपरी : विरोधकांचा उमेदवार राष्ट्रवादीचा की महाविकास आघाडीचा ? | पुढारी

पिंपरी : विरोधकांचा उमेदवार राष्ट्रवादीचा की महाविकास आघाडीचा ?

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : चिंचवड विधानसभेसाठी भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. सहानुभूती तसेच, जगताप यांचे मतदार संघातील मोठे कार्य यामुळे अश्विनी जगताप यांचा विजय एकतर्फी असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. दुसरीकडे, प्रमुख प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा महाविकास आघाडी कोणता उमेदवार देणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवार (दि.6) व मंगळवार (दि 7) असे केवळ 2 दिवस शिल्लक आहेत. इतका कमी कालावधी शिल्लक असताना राष्ट्रवादी किंवा महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार निश्चित झालेला नाही. राष्ट्रवादीसह शिवसेना या जागेवर अडून बसली आहे. तो तिढा सुटून महाविकास आघाडीचा उमेदवार उद्या (रविवार)पर्यंत अंतिम होईल, असे स्थानिक पदाधिकारी सांगत आहेत.

राजकीय गणिते अधिक मजबूत करण्यासाठी भाजपकडून उमेदवार जाहीर होईपर्यन्त आपला उमेदवार घोषित करायचा नाही, असा दावा विरोधक करीत आहेत. त्याचा किती फायदा होईल हे 2 मार्चला मतमोजणीनंतर समजेल.

अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपाला सहानुभूतिचा निश्चितच फायदा होऊ शकतो मात्र गतवेळेच्या विधानसभा निवडणूक वेळी काट्याची टक्कर देणारे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे हे थेट राष्ट्रवादीकडून उभे राहण्याची चर्चा असल्याने आणि राष्ट्रवादीने लवकरच भूमिका जाहिर करणार असल्याचे स्पष्ट केल्याने ही निवडणूक रंगतदार होणार हे स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे विरोधक कोणाला रिंगणात उतरवतात याची उत्सुकता लागली आहे. राष्ट्रवादीकडे दहापेक्षा अधिक इच्छुक आहेत. त्यात यापूर्वी विधानसभा निवडणूक लढलेले ही आहेत. दुसरीकडे, तब्बल 100 पेक्षा अधिक इच्छुकांनी अर्ज नेले आहेत. त्यामुळे उमेदवारांची संख्या वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

राहुल कलाटे शिवसेना की राष्ट्रवादीकडून?
शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 1 लाख 12 हजार 225 मते घेत लक्ष्मण जगताप यांच्यासमोर आव्हान निर्माण केले होते. त्यामुळे शिवसेना त्या जागेवर हक्क सांगत आहे. या जागेवरून राष्ट्रवादी व शिवसेना समोरासमोर आल्याने महाविकास आघाडीसमोर नवा पेच निर्माण झाल्याचे दिसत आहे. राहुल कलाटे शिवसेना की राष्ट्रवादीकडून मैदानात उतरतात का, वेगळाच चेहरा समोर आणला जाईल? याची राजकीय क्षेत्रात चर्चा रंगली आहे.

मी लढायला तयार
मी चिंचवड पोटनिवडणूक लढण्यास तयार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि आघाडीचे इतर नेते जो निर्णय घेतील, त्यानुसार मी निवडणूक लढेन. माझी पूर्ण तयारी आहे, असे शिवसेनेचे माजी गट नेते राहुल कलाटे यांनी स्पष्ट केले आहे.

एकूण मतदार : 5 लाख 66 हजार 415
पुरुष : 3 लाख
1 हजार 650
महिला : 2 लाख
64 हजार 732
इतर 35
मतदान केंद्र 510

Back to top button