पिंपरी : ‘पीएमआरडीए’च्या घरांचा ताबा कधी? | पुढारी

पिंपरी : ‘पीएमआरडीए’च्या घरांचा ताबा कधी?

पिंपरी : पीएमआरडीएची पेठ क्रमांक 12 येथे घरे बांधून तयार असली तरी सध्या मूलभूत सुविधा विकसित करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे येथील घरांचा ताबा अद्याप लाभार्थी नागरिकांना देण्यात आलेला नाही. या गृहप्रकल्पातील घरासाठी बँकांचे कर्ज घेतलेल्या काही नागरिकांना बँकांचे हप्तेदेखील सुरू झाले आहेत. मात्र, अद्याप घर ताब्यात न मिळाल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.

तत्कालीन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून पेठ क्रमांक 12 मधील 4 हजार 883 घरांसाठी सोडत काढण्यात आली होती. या सोडतीनंतर निवड आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली. दरम्यान, प्राधिकरणाचे पीएमआरडीएमध्ये विलीनीकरण झाले. त्यामुळे हा प्रकल्प आता पीएमआरडीएच्या अखत्यारित आला आहे.

या गृहप्रकल्पात एकूण 4 हजार 883 घरे सध्या बांधून तयार झाली आहेत. मात्र, येथे आवश्यक विविध मूलभूत सुविधा विकसित करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामध्ये प्रामुख्याने रस्ते, विद्युत वाहिन्या, मैलाशुद्धीकरण केंद्र, विद्युतविषयक कामे आणि अन्य सुविधांचा समावेश आहे.

10 टक्के रकमेच्या अटीमुळे प्रतिसाद घटला
पेठ क्रमांक 12 येथील घरांसाठी सोडत प्रक्रिया पार पडली असली, तरी घरांच्या एकूण किमतीच्या 10 टक्के रक्कम आगाऊ भरण्याची अट पीएमआरडीएने ठेवली. तसेच, एलआयजी गटातील घरांच्या किमती जास्त असल्याने नागरिकांचा या प्रकल्पाला पुरेशा प्रमाणात प्रतिसाद मिळालेला नाही. पर्यायाने, पहिल्या टप्प्यात 793 एलआयजी घरांसाठीच्या सदनिका शिल्लक राहिल्या. तर, ईडब्ल्यूएस गटाच्या 31 सदनिका शिल्लक राहिल्या, त्यामुळे त्यासाठी पुन्हा अर्ज मागविण्यात आले आहे.

एलआयजीतील घराची किंमत 32 लाख
पेठ क्रमांक 12 मधील गृहप्रकल्पात एलआयजी गटासाठी असलेल्या सदनिकांसाठी 32 लाख तर, ईडब्ल्यूएस गटासाठी असलेल्या सदनिकांसाठी सुमारे 7 लाख 40 हजार इतकी किंमत निश्चित केलेली आहे. सदनिकांसाठी आगाऊ 10 टक्के रक्कम घेऊ नये, अशी अनेक नागरिकांची मागणी होती. तसेच पीएमआरडीएच्या मुख्यत्वे एलआयजी गटातील घरांच्या किमती जास्त असल्याने ते परवडण्यासारखे नसल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले होते.

घरांचा ताबा लवकर द्या
नागरिकांनी पीएमआरडीएच्या घरांसाठी बँकेतून कर्ज घेतले आहे. काही जणांना नातेवाइकांकडून उसने पैसे, स्वतःकडील बचत, दागदागिने मोडून रक्कम उभी केली आहे. या नागरिकांना एकीकडे बँकेचे हप्ते सुरू झाले आहे. तर, दुसरीकडे ते राहत असलेल्या घरासाठी दरमहा भाडे मोजत आहे. ज्यांनी नातेवाइकांकडून पैसे घेतले आहेत, त्यांना ते पैसे टप्प्याटप्प्याने फेडावे लागत आहेत. पीएमआरडीएने घरांचा ताबा लवकरात लवकर द्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

पेठ क्रमांक 12 मधील गृहप्रकल्पामध्ये सध्या मुलभूत सुविधांची कामे सुरू आहे. येथील घरांसाठी आवश्यक नोंदणीप्रक्रियेला दीड महिन्याचा कालावधी लागेल. या गृहप्रकल्पातील शिल्लक राहिलेल्या सदनिकांसाठी अर्ज केलेल्या नागरिकांच्या कागदपत्रांची तपासणी सध्या सुरू आहे. त्यांना महिना अखेरपर्यंत अंतिम वाटपपत्र दिले जाईल. तर, गृहप्रकल्पातील सदनिकांचा ताबा लाभार्थी नागरिकांना एप्रिलपर्यंत देण्याचे नियोजन सुरू आहे.

                                            – बन्सी गवळी, सह-आयुक्त, पीएमआरडीए.

पेठ क्रमांक बारामधील ईडब्ल्यूएसमधील घरासाठी मी सर्व रक्कम भरली आहे. बँकेचे कर्ज न मिळाल्याने त्यासाठी स्वतः जमवलेले पैसे भरले. तसेच, नातेवाइकांकडून पैसे उसने घेतले. गतवर्षी दिवाळीच्या सुमारास घरांचा ताबा देणार होते. मात्र, आता जानेवारी उलटला तरी घरांचा ताबा दिलेला नाही.
                                                        – एक लाभार्थी नागरिक.

Back to top button