पुणे : मुक्ता टिळक यांच्या निष्ठेचा भाजपला विसर ; पती शैलेश टिळक यांचा नाराजीचा सूर | पुढारी

पुणे : मुक्ता टिळक यांच्या निष्ठेचा भाजपला विसर ; पती शैलेश टिळक यांचा नाराजीचा सूर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केल्याने दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुक्ता टिळक यांच्या पक्षनिष्ठेचा भाजपला विसर पडल्याची भावना टिळक कुटुंबीयाने व्यक्त केली. त्यामुळे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केसरीवाडा गाठत टिळक यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने शनिवारी आपल्या उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये कसबा पेठ विधानसभेसाठी हेमंत रासने आणि चिंचवड विधानसभेसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली. चिंचवडमध्ये दिवंगत आमदारांच्या घरात उमेदवारी दिली. मात्र, कसब्यात दिवंगत आमदारांच्या घरात उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे आमदार टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.
’मुक्ता टिळक यांचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी घरातील व्यक्तीला उमेदवारी मिळावी, अशी आमची अपेक्षा होती.

परंतु, पक्षाने वेगळा निर्णय घेतला. शहरात ब—ाह्मण समाजाचे प्रतिनिधित्व करणारा आमदार नसल्याने समाजामध्ये अन्याय झाल्याची भावना आहे. मुक्ता टिळक यांनी सदैव पक्षासाठी काम केले. त्यांच्यासोबत अनेक वर्षे काम करणार्‍या सहकार्‍यांनी त्याची जाण ठेवायला हवी होती. ’एखाद्या आमदाराचे अकाली निधन झाल्यावर उर्वरित कार्यकाळात त्याच्या घरातील व्यक्तीलाच उमेदवारी देण्याकडे सर्वच पक्षांचा कल असतो. त्यानुसार, घरातील व्यक्तींनाच संधी मिळणे अपेक्षित होते. तीच मुक्ता टिळक यांना खरी श्रद्धांजली ठरली असती, तसेच निवडणूकही बिनविरोध झाली असती. पक्षाने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असून, पक्षविरोधी काम करणार नाही, असेही टिळक यांनी नमूद केले.

गिरीश महाजन यांची केसरीवाड्यात धाव

पोटनिवडणुकीची उमेदवारी न मिळाल्याने टिळक कुटुंबाने माध्यमांसमोर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर भाजपनेत्यांकडून त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून मंत्री गिरीश महाजन यांनी केसरीवाड्यात धाव घेऊन टिळक कुटुंबीयांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना भाजप टिळक कुटुंबाचा योग्य तो सन्मान करेल, असे म्हटले आहे.

Back to top button