पुणे : ‘म्हाडा’च्या सोडतीसाठी 25 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ | पुढारी

पुणे : ‘म्हाडा’च्या सोडतीसाठी 25 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  ’म्हाडा’च्या पुणे मंडळाने विविध उत्पन्न गटांतील नागरिकांसाठी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील 5 हजार 915 घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत शनिवारपर्यंत (दि. 4 ) होती. मात्र, यंदा अर्ज करतानाच सर्व कागदपत्रे सादर करणे बंधनकारक होते. ही कागदपत्रे मिळण्यास नागरिकांबरोबरच लोकप्रतिनिधींनादेखील अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर म्हाडाने घरांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास 25 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे, तर घरांची सोडत 7 मार्च रोजी जाहीर होणार आहे.

म्हाडा सोडतीला मुदतवाढ देण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला होता. त्यानुसार म्हाडाच्या पुणे मंडळाने शुक्रवारी घरांसाठी अर्ज करण्याला मुदतवाढ दिल्याचे जाहीर केले. म्हाडाच्या विविध योजनेतील 2 हजार 594 सदनिका, 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत 2 हजार 990 सदनिका आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 396 सदनिका अशा एकूण 5 हजार 915 सदनिकांसाठी सोडत होत आहे. यामध्ये प्रथम येणार्‍यास प्राधान्यअंतर्गत 2 हजार 925 घरे उपलब्ध आहेत. यंदा प्रथमच अर्जासोबत अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला तसेच आरक्षण असणार्‍या वर्गातून अर्ज करत असल्यास त्याचे प्रमाणपत्र असे पुरावे ऑनलाइन अर्जासोबत सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच या अर्जांची छाननीदेखील ऑनलाइन करण्यात येत आहे. त्यामुळे विविध प्रमाणपत्र जमा करण्यासाठी नागरिकांची धावपळ होत आहे.

काहींना अर्ज करूनही अजून प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यामुळे म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून ही मुदतवाढ देण्यात आली आहे, असे म्हाडा पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांनी सांगितले.

सोडतीचे सुधारित वेळापत्रक

ऑनलाइन अर्जासाठी नोंदणीची अंतिम मुदत 25 फेब्रुवारी
सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत – 26 फेब्रुवारी
अनामत रक्कम स्वीकृती अंतिम मुदत
27 फेब्रुवारी
सोडतीसाठी अंतिम अर्जांची प्रारूप यादी प्रसिद्ध – 3 मार्च
अंतिम यादी – 5 मार्च
सोडत – 7 मार्च

Back to top button