पुणे : सव्वालाख तरुणाईचा नशामुक्तीचा संकल्प | पुढारी

पुणे : सव्वालाख तरुणाईचा नशामुक्तीचा संकल्प

पुणे : वृत्तसेवा :  ‘मी नशा करणार नाही आणि कोणालाही करू देणार नाही…’ तब्बल सव्वालाख मुखांतून हा आवाज कोथरूडच्या विस्तीर्ण मैदानावर घुमला….अन् ही शपथ तरुणाईला देत होते साक्षात आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रवीशंकर. या उत्स्फूर्त अन् भारलेल्या वातावरणात शनिवारी (दि. 4) तरुणाईने एकत्र येत नशामुक्तीचा संकल्प केला अन् नशामुक्त समाजासाठी प्रयत्न करण्याचाही नारा बुलंद केला. ‘जुने सोडून आयुष्यात काहीतरी नवे करा. तणावमुक्त राहा, त्यासाठी ध्यान आणि प्राणायम करा. खूष राहा अन् आपले स्वप्न जगा,’ असा सल्लाही श्री श्री रवीशंकर यांनी तरुणाईला दिला.

आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनसह विविध शैक्षणिक संस्थांच्या पुढाकाराने एज्यु यूथ मीट हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी तरुणाईशी मनमोकळा संवाद साधला. यानिमित्ताने ‘नशा करणार नाही आणि नशा करू देणार नाही…’ अशी शपथ घेत पुण्यातील 1 लाख 23 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केला. या संकल्पाची लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, ‘नॅक’चे अध्यक्ष डॉ.भूषण पटवर्धन, एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक विश्वनाथ कराड, राजेश पांडे, डॉ. नितीन करमळकर आदी उपस्थित होते.

भारताला नशामुक्त फक्त युवापिढीच करू शकते, असे सांगत श्री श्री रवीशंकर म्हणाले, ‘शिस्त तोडणे हे युवा असण्याचे लक्षण असते. पण, सगळ्यात पहिले शिस्त पाळणे महत्त्वाचे असते. युवापिढीला नवा उत्साह आणि उमंगासोबत चालायचे आहे. भारताला नशामुक्त युवा पिढीच करू शकते. नशा करणार नाही, करू देणार नाही हा संकल्प कधीच तोडू नये. तरुणाईचा उत्साहच त्यांना तरुण बनवतो. युवा नेहमी विचार करतो प्रत्येक गोष्ट सोप्या रीतीने व्हावी. प्रत्येक गोष्टीत आव्हानाला सामोरे जाण्याची उमंग आणि उत्साह ठेवतो तो युवा असतो. मौजमजा करणे हे युवापिढीचे काम आहे. पण, त्याने सगळ्यांचे कल्याण व्हावे, नुकसान होऊ नये हे ध्यानात ठेवा. प्रत्येकात क्रिएटिव्ही असली पाहिजे. भारतात प्रतिभावान व्यक्तीचे हे लक्षण आहे.

भारतातली युवापिढी काहीतरी नवे करण्यासाठी सक्षम आहे.’ नवीन शैक्षणिक धोरणानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि इतर शैक्षणिक संस्थांसोबत 5 सामंजस्य करार करण्यात आले. तसेच मुरलीकांत पेटकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. माजी सैनिक यशवंत महाडीक आणि ‘महाराष्ट्र केसरी’ विजेता शिवराज राक्षे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी श्री श्री रवीशंकर यांनी तरुणाईच्या विविध प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. तर या वेळी झालेल्या लाइव्ह म्युझिक बॅण्डच्या गीतांवर तरुणाईने ठेका धरला.

 

वर्षानुवर्षे आपण आंधळेपणाने शिक्षण घेत आहोत. जुन्या अभ्यासक्रमातील प्रचंड माहितीच्या ओझ्याने आपण दबले गेले आहोत. ज्याचा आपल्याला व्यावहारिक आयुष्यात काहीच उपयोग होत नाही. मोबाईलच्या एका क्लिकवर सगळी माहिती उपलब्ध असते. त्यामुळे रट्टे मारण्याला आता काही अर्थ नाही. विद्यार्थ्यांमधील प्रतिभेला जागृत करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण उपयोगी ठरेल. प्रत्येक विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्था आनंदाचे, नवनिर्मितीचे कॅम्पस झाले पाहिजेत. नवीन शैक्षिणक धोरण हे क्रांतिकारक पाऊल आहे.
                                                                               – श्री श्री रवीशंकर

Back to top button