पुणे: गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात महिलांच्या हाती दांडकी, युवकांना वठणीवर आणण्यासाठी महिलांचा पवित्रा | पुढारी

पुणे: गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात महिलांच्या हाती दांडकी, युवकांना वठणीवर आणण्यासाठी महिलांचा पवित्रा

राजगुरुनगर, पुढारी वृत्तसेवा: लावणी क्वीन गौतमी पाटील हिच्या लावणी कार्यक्रमात धुडगूस घालून वारंवार व्यत्यय आणणाऱ्या युवकांना वठणीवर आणण्यासाठी चक्क गावातील महिलांना हातात दांडकी घ्यावी लागली. गौतमी पाटील हिचे एकही गाणे पूर्णपणे वाजले नाही. एकंदर कार्यक्रम वादग्रस्त ठरला.

खेड तालुक्यातील बहिरवाडी गावात शुक्रवारी (दि. ३) हा प्रकार अनुभवायला मिळाला. बहिरवाडी गावच्या ग्रामदैवत यात्रेनिमित्त करमणुकीसाठी दरवर्षी तमाशाचा कार्यक्रम होतो. मात्र, भविष्यात होणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वेळी दिलखेच गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गौतमी पाटील ही लावणीच्या कार्यक्रमातून राज्यभर वादग्रस्त ठरत असताना खेड तालुक्यात पहिल्यांदा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला युवकांची मोठी गर्दी होती. सुरुवातीपासूनच युवकांनी आरडाओरडा, धुडगूस करायला सुरुवात केली. आयोजकांना हा युवकवर्ग आवरणे कठीण होऊ लागले. गावच्या यात्रेनिमित्त कार्यक्रम असल्याने अखेर गावातील महिलांनी हातात लाठ्या-काठ्या घेऊन व्यासपीठाला संरक्षण दिले. धुडरूस घालणाऱ्या घोळक्यावर धाऊन जात अनेक युवकांना दांडक्याने अक्षरशः मारले. मात्र, हा गोंधळ अखेरपर्यंत आटोक्यात आला नाही. गोंधळाच्या वातावरणात कार्यक्रम कसाबसा पार पडला.

राज्यभर प्रसिद्ध असलेल्या गौतमी पाटील यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. युवकांच्या हुल्लडबाजीमुळे हा कार्यक्रम वादग्रस्त ठरत आहे. आमच्या ग्रामीण बहिरवाडीत त्यादृष्टीने माझ्या नेतृत्वाखाली मी महिलांना नियोजनात सहभागी करून घेतले होते. त्यामुळे कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही.
– वसुधा अंकुश राक्षे, सरपंच, बहिरवाडी

Back to top button