पिंपरी : चोख सुरक्षा व्यवस्था ठेवावी; सचिन ढोले यांची पोलिसांना सूचना | पुढारी

पिंपरी : चोख सुरक्षा व्यवस्था ठेवावी; सचिन ढोले यांची पोलिसांना सूचना

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी कायदा व सुव्यवस्थेमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही. तसेच कोणताही गैरप्रकार होणार नाही, याची दक्षता पोलिस यंत्रणेने घ्यावी. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राहिलेल्या शेवटच्या दोन दिवसांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवावी, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी पोलिस अधिकार्‍यांना शुक्रवारी (दि.3) केली.

निवडणूक निर्णय अधिकारी ढोले यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस प्रशासन व निवडणूक अधिकार्‍यांची बैठक थेरगाव कार्यालयात झाली. बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बैठकीस सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील, शीतल वाकडे, शिरीष पोरेडी, निवडणूक सहाय्यक नागेश गायकवाड, वाकड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त श्रीकांत डिसले, निवडणूक कक्ष अधिकारी प्रशांत शिंपी, आचारसंहिता कक्षप्रमुख आबासाहेब ढवळे, नोडल अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह सेक्टर ऑफिसर उपस्थित होते.

तसेच, वाकड, सांगवी, देहूरोड, चिंचवड, हिंजवडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डॉ.विवेक मुगळीकर, शिवाजी गवारे, स.बा.माने, सुनील टोनपे, सुनील पिंजण, उपनिरीक्षक राजेंद्र होणराव उपस्थित होते. सचिन ढोले म्हणाले की, मतदान केंद्र, मतदारसंख्या यादृष्टीने चिंचवड मतदारसंघ सर्वात मोठा आहे. त्यामुळे निवडणूक कामकाजासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागणार आहे.

यासाठी सर्व बाबींचा विचार करून नियोजन केले जात आहे. पोलिस प्रशासनाने निवडणूक कामकाजासाठी आवश्यक त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी योग्य तो पोलिस बंदोबस्त तैनात करावा, आदी सूचनाही ढोले यांनी केल्या. सहायक पोलिस आयुक्त श्रीकांत डिसले म्हणाले की, निवडणूकप्रक्रिया शांततेने व सुरळीतपणे पार पडण्यासाठी पोलिस प्रशासनाने नियोजन केले आहे. निवडणूक कामकाजासाठी पोलिसांचे संपूर्ण सहकार्य राहील.

निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांशी चर्चा
पोटनिवडणुकीची आचारसंहिता 2 मार्चपर्यंत आहे. निवडणूक सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस व निवडणूक कामाकाजासाठी नेमलेल्या प्रशासकीय यंत्रणेसमवेत समन्वय राखण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना व नियोजनाबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. मतदान केंद्रामधील सुविधा, मतदान केंद्राचे साहित्य वाटप, मतदार संघातील संवेदनशील व असुरक्षित मतदान केंद्रांची निश्चिती तसेच, तेथील सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन, मागील निवडणुकीच्या कालावधीतील नोंदविलेल्या गुन्ह्यांची माहिती घेणे, संवेदनशील मतदारसंघांचा आढावा घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

Back to top button