चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक : चार दिवसांत 170 अर्जांचे वितरण | पुढारी

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक : चार दिवसांत 170 अर्जांचे वितरण

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.3) 32 जणांनी एकूण 62 उमेदवारी अर्ज नेले. त्यात भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे, प्रशांत शितोळे यांचा समावेश आहे. चार दिवसांत तब्बल 170 अर्जांचे वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे निवडणुकीत उमेदवारांची गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

थेरगाव येथील ग क्षेत्रीय कार्यालयात अर्ज वाटप व दाखल करून घेतले जात आहे. शुक्रवार (दि. 3) विविध पक्षाच्या 32 जणांनी अर्ज नेले. भाजपकडून प्रबळ दावेदार असलेले आ. जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी अर्ज घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, पक्षाचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी उमेदवारी अर्ज घेतले. काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष दिलीप पांढरकर, महिला शहराध्यक्षा सायली नढे, ज्ञानेश्वर मलशेट्टी यांनी अर्ज घेतले.

तसेच, संतोष नवले, शंकर माने, नंदू बारणे, प्रवीणकुमार कदम, श्रीकांत गोरे, मनोज खंडागळे, सतीश कांबिये, सुरेश जगधने, प्रतिमा राजे, राहुल मदने, अ‍ॅड. मिलिंद कांबळे, मेहुल जोशी, श्रीगणेश कदम, दयानंद सरवदे, रवी नांगरे, निखिल भोईर, भाग्यश्री भोईर, झेविअर अ‍ॅन्थोनी, सचिन धनकुडे, सुहास गजरमल, आनंद काटे, प्रियंका कदम, स्वप्नील बनसोडे, राजश्री कोरडे यांनी अर्ज नेले.

अल्पसंख्याक विकास महासंघाचे अध्यक्ष रफिक कुरेशी यांनी अपक्ष म्हणून एकमेव अर्ज दाखल केला. आतापर्यंत एकूण 4 अर्ज दाखल झाले आहेत. चार दिवसांत तब्बल 170 अर्जांचे वितरण करण्यात आले. तर, 4 जणांनी अर्ज भरले आहेत. अर्ज वाटप व दाखल करून घेण्याची मुदत मंगळवार (दि.7) पर्यंत आहे. आणखी 4 दिवस शिल्लक असल्याने मोठ्या संख्येने अर्ज नेले जाऊ शकतात. अर्ज भरणार्‍यांची संख्याही वाढू शकते. परिणामी, ईव्हीएम मशिनवर दोन बॅलेटपेपर वापरावे लागू शकतात.

Back to top button