कसबा, चिंचवडचे मविआचे उमेदवार रविवारपर्यंत जाहीर होतील : विरोधी पक्षनेते अजित पवार यांची माहिती | पुढारी

कसबा, चिंचवडचे मविआचे उमेदवार रविवारपर्यंत जाहीर होतील : विरोधी पक्षनेते अजित पवार यांची माहिती

बारामती, पुढारी वृत्तसेवा: पुण्यातील कसबा पेठ व चिंचवड मतदार संघाच्या पोटनिवडणूकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार रविवारी (दि. ५) संध्याकाळपर्यंत निश्चित होतील, अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. चिंचवडच्या जागेसाठी शिवसेना (ठाकरे गट) आग्रही असल्याच्या प्रश्नावर यासंबंधीचा अंतिम निर्णय महाविकास आघाडीचे वरिष्ठ घेतील, असे स्पष्टीकरण पवार यांनी दिले.

बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. कसबा पेठ व चिंचवडच्या पोटनिवडणूकीसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीचा निर्णय झाला का? अशी विचारणा केली असता पवार म्हणाले, यासंबंधी आज (शनिवारी) बैठक सुरु आहे. त्यात अद्याप काही निर्णय झालेला नाही. रविवारी संध्याकाळपर्यंत उमेदवार जाहीर होतील.

चिंचवडची जागा शिवसेनेला मिळण्याबाबत खासदार संजय राऊत आग्रही असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, प्रत्येकाला आपापल्या पक्षासाठी आग्रह धरण्याचा अधिकार आहे. पंरतु मविआचे वरिष्ठ यासंबंधी अंतिम निर्णय घेतील, त्या पद्धतीने सगळे वागतील असा मला विश्वास आहे.

मी काही ज्योतिषी नाही

शिवसेना (ठाकरे गट) व बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात पक्ष चिन्हाविषयी सुरु असलेल्या संघर्ष संपल्यानंतरच मंत्रीमंडळ विस्तार होईल, असे बोलले जात असल्याच्या प्रश्नावर पवार यांनी मी काही ज्योतिषी किंवा भविष्य बघणारा नाही. साधारणतः ज्या गोष्टी घडतात त्यावर मी माझे मत व्यक्त करत असतो. हा कोण तरी असे म्हणाला तो तसे म्हणाला यावर मी उत्तर देत नाही. एखादी जबाबदार व्यक्ती बोलली असेल तरच त्यावर उत्तर देतो. काही काही मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्ती काही तरी बरळत असतात. त्यांना उत्तर देण्याचे काही कारण नाही. अशा व्यक्तींच्या वक्तव्यावर आमच्यासारख्यांनी वक्तव्ये करत वेळ वाया घालवण्याचे काही कारण नाही.

सत्यजित तांबे यांचा भविष्यकाळ उज्ज्वल

नाशिक पदवीधर मतदारसंघातील विजयी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी अर्ज भरण्यापूर्वी काय राजकारण झाले, यासंबंधी मी विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांना बोललो असल्याचे वक्तव्य केले होते. त्यासंबंधीच्या प्रश्नावर पवार म्हणाले, माझे तांबे यांच्याशी बोलणे झालेले नव्हते. आज सकाळी मी बारामतीत फिरत असताना तेथे त्यांचा फोन आला. त्यावेळी मी त्यांना, तु तरुण आहेस, तुला उज्ज्वल भवितव्य आहे, त्यामुळे फार शांतपणे, बारकाईने विचार करून पुढील रणनिती ठरव, आवश्यकता वाटल्यास आपण मंगळवार किंवा बुधवारी मुंबईत भेटून सविस्तर बोलू, असे सांगितले असल्याचे पवार म्हणाले.

Back to top button