पिंपरी : कर्करोग उपचारासाठी शहरात नाही सुविधा.. | पुढारी

पिंपरी : कर्करोग उपचारासाठी शहरात नाही सुविधा..

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : वाढती व्यसनाधीनता, तंबाखू सेवन आणि मद्यपानाचे जास्त प्रमाण यामुळे कर्करोगाचे रुग्ण वाढत आहेत. त्यातही 25 ते 30 च्या वयोगटातही या आजाराचे रुग्ण आढळू लागले आहेत. कर्करोगाची वाढती दाहकता लक्षात घेता महापालिकेने कर्करोगावर उपचारासाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्याची गरज आहे. मात्र, याबाबत केवळ प्राथमिक चर्चा झाली असून पुढील कार्यवाहीबाबत महापालिका प्रशासनाने कोणतेही ठोस नियोजन केलेले नाही.

तरुणांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढतेय
देशामध्ये 10 ते 15 वर्षांपूर्वी प्रतिएक लाख लोकसंख्येमागे 50 ते 60 कर्करोगाचे रुग्ण आढळत होते. सध्या हे प्रमाण प्रतिएक लाख लोकसंख्येमागे 100 इतके झाले आहे. तंबाखू आणि गुटखा सेवनामुळे 25 ते 30 च्या वयोगटांतील तरुणांमध्ये फुफ्फुस आणि मुख कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. तर, 40 ते 50 च्या वयोगटातील महिलांमध्ये स्तनाचा आणि गर्भाशयाचा कर्करोग पाहण्यास मिळत आहे.

कर्करोग उपचाराचा वॉर्डही नाही
महापालिकेच्या पिंपरी- संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात 2010 पूर्वी कर्करोगाचा स्वतंत्र वॉर्ड होता. तसेच, बाह्यरुग्ण विभागदेखील होता. त्या वेळी पिंपरी-चिंचवडसह आजूबाजूच्या गावातूनही येथे रुग्ण उपचारासाठी येत होते. मात्र, रुग्णालयातील हा वॉर्ड सध्या बंद करण्यात आलेला आहे. महापालिकेचे कर्करोगावर स्वतंत्र रुग्णालय किंवा वॉर्डदेखील नाही.

महापालिकेचे नियोजन कागदावरच
महापालिका प्रशासनाने थेरगाव येथील नवीन रुग्णालयाजवळ कर्करोगासाठी स्वतंत्र रुग्णालयाचे नियोजन सुरू केले होते. त्यासाठी आवश्यक केमोथेरपी, रेडियोथेरपी, शस्त्रक्रिया आदी व्यवस्था करण्यात येणार होती. मात्र, हा प्रस्ताव सध्या कागदावरच आहे. त्याबाबत केवळ प्राथमिक चर्चा झालेली आहे. पुढे कोणतेही नियोजन ठरलेले नाही.

कर्करोगाची काही धोक्याची लक्षणे
वारंवार बद्धकोष्टता किंवा अतिसार होणे
मूत्र विसर्जनास त्रास होणे
नेहमीपेक्षा वेगळा रक्तस्त्राव होणे
स्तन किंवा इतर अवयवास गाठ आढळून येणे
अपचन किंवा गिळण्यास त्रास होणे
सतत खोकला किंवा आवाजात घोगरेपणा येणे.

काय काळजी घ्याल
नियमित व्यायाम करावा. स्थुलपणा टाळावा.
मद्यपान व तंबाखू सेवन टाळावे.
आहारात फळे व हिरव्या पालेभाज्यांचा भरपूर प्रमाणात समावेश करावा.
आहारात मिठाचे प्रमाण संतुलित ठेवावे.
वर्षातून एकदा कर्करोगाची तपासणी करून घ्यावी.

महापालिकेच्या वतीने कर्करोगासाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्याबाबत केवळ प्राथमिक चर्चा झालेली होती. अद्याप याबाबत कोणतेही नियोजन ठरलेले नाही.

 – डॉ. लक्ष्मण गोफणे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका.

कर्करोगाचे रुग्ण पूर्वी 60 वर्षाच्या पुढे आढळत होते. मात्र, सध्या परिस्थिती बदलली आहे. 25 ते 30 च्या वयोगटांतील तरुणांना तंबाखू आणि गुटखा सेवनाने मुखाचा आणि फुफ्फुसाचा कर्करोग होत आहे. तर, 40 ते 50 च्या वयोगटातील महिलांमध्ये स्तनाचा आणि गर्भाशयाचा कर्करोग पाहण्यास मिळत आहे. कर्करोगाबाबत वेळीच लक्ष देऊन आवश्यक चाचण्या व उपचार करून घ्यायला हवे.

                                      – डॉ. राकेश नेवे, कर्करोग

Back to top button