पुणे : पोलिसांची सराईतांविरुद्ध धडक कारवाई मोहीम ; 3 हजार 700 जणांविरुद्ध कारवाई | पुढारी

पुणे : पोलिसांची सराईतांविरुद्ध धडक कारवाई मोहीम ; 3 हजार 700 जणांविरुद्ध कारवाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शॉर्टलिस्ट केलेल्या सराईतांविरुद्ध धडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार तब्बल 3 हजार 700 हून अधिक रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.  पोलिस आयुक्त रितेश कुमाक्त, संदीप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या विविध पथकांकडून संकलित माहितीच्या आधारे सराईतांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यावर भर देण्यात आला आहे. मागील काही दिवसांत तब्बल 3 हजार 700 हून अधिक गुन्हेगार, त्यांचे ठिकाण, हालचालींवर लक्ष ठेवून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याशिवाय 9 गुन्हेगारी टोळ्यांमधील 65 गुन्हेगारांना मोक्काचा दणका देण्यात आला आहे. एमपीडीएनुसार 3 गुन्हेगारांना स्थानबध्द करण्यात आले असून, 42 जणांना तडीपार करण्यात आले आहे.

रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह भाईगिरी-दादागिरी करणार्‍यांविरुद्ध ऑपरेशन ऑल आऊट, कॉम्बिंग ऑपरेशन राबविले जात आहे. गुन्हेगार चेकिंग, गुन्हेगार आदान-प्रदान, दत्तक गुन्हेगार योजना राबवून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत ओह. सराईत गुन्हेगारांवर परिणामकारक प्रतिबंधात्मक कारवाईसाठी गुन्हे शाखेकडून वेळोवेळी ड्राइव्ह घेण्यात येत आहे. त्याशिवाय महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, औषधी द्रव्यविषयक हातभट्टीवाले, धोकादायक व्यक्तीच्या विघातक कृत्यास आळा घालण्यासाठी एमपीडीएअंतर्गत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येत आहे.

कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी सराईत गुन्हेगारांविरुद्ध कारवाईचा डेटा एकत्रित करण्यात आला आहे. त्यानुसार विविध पोलिस ठाण्यांतर्गत सराईत गुन्हेगार, रायझिंग गँग, भाईगिरी व दादागिरी करणार्‍या 11 हजारांवर गुन्हेगारांची कुंडली बनविण्यात आली. कोम्बिंग ऑपरेशनांतर्गत कारवाईचा बडगा सुरू असतानाच शॉर्टलिस्ट सराइतांवर अंकुश ठेवण्यासाठी विशेष मोहिमेद्वारे कारवाई केली जात आहे. गुन्हे शाखेकडून 11 हजारांवर गुन्हेगारांची कुंडली तयार करण्यात आली होती. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या आदेशानुसार प्रतिबंधात्मक कारवाईला वेग देण्यात आला आहे.

Back to top button