पुणे : सातगाव पठारला ज्वारीचे पीक जोमदार | पुढारी

पुणे : सातगाव पठारला ज्वारीचे पीक जोमदार

पेठ : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागात सहा हजार एकर क्षेत्रावर ज्वारीचे पीक घेण्यात आले आहे. अनुकूल वातावरणामुळे पिकाची वाढ जोमात झाली आहे. ज्वारी पिकास मोठमोठे गोंडे आल्याने यंदा ज्वारीचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.  कुरवंडी, कारेगाव, थुगाव, भावडी भागांतील शेतकरी पाखरांपासून ज्वारीची राखण करीत आहेत. तसेच रानडुकरांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठीदेखील शेतकरी उपाययोजना करीत आहेत.

ज्वारी पीक तीन महिन्यांचे झाल्याने जोमदार ताटे व टपोरी कणसे आता पूर्ण भरायला लागली आहेत. येत्या महिन्यात ज्वारी काढणीची कामे सुरू होतील, तोपर्यंत शेताचे संरक्षण करावे लागेल, असे थुगाव येथील शेतकरी वसंतराव एरंडे, सोपानराव नवले यांनी सांगितले.
ज्वारीची वाढ जोमदार झाल्याने या पिकांत बिबट्यादेखील आश्रय घेऊ शकतो, अशी शक्यता शेतकर्‍यांनी व्यक्त केली. पिकाची काढणी करताना विशेष काळजी घ्यावी लागणार असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

Back to top button