पिंपरी : सराईत गुन्हेगार अनिल मोहितेवर मोका; चुलत भावाची दिली होती खुनाची सुपारी | पुढारी

पिंपरी : सराईत गुन्हेगार अनिल मोहितेवर मोका; चुलत भावाची दिली होती खुनाची सुपारी

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : सख्ख्या चुलत भावाच्या खुनाची सुपारी देणारा सराईत गुन्हेगार अनिल मोहितेसह त्याच्या टोळीतील दहा जणांवर मोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत) कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, 6 डिसेंबर रोजी रिक्षात आलेल्या तिघांनी पिंपरीत गोळीबार केला. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी माण येथील एका शेतकर्‍याचा खून करणार असल्याची धक्कादायक कबुली दिली. त्यासाठी त्यांनी 45 लाख रुपये इतकी रक्कम ठरवली होती.

आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अनिल मोहिते याने जमिनीच्या वादातून त्याचा सख्खा चुलत भाऊ संतोष मोहिते याची सुपारी दिल्याचे समोर आले. त्यासाठी आरोपींनी उत्तर प्रदेश येथून पिस्तूल व राउंडदेखील विकत घेतले होते. मात्र, संतोष मोहिते यांच्या हत्येचा कट शिजत असतानाच आरोपींनी दारूच्या नशेत पिंपरी कॅम्प परिसरात हवेत गोळीबार केला. या गोळीबारामुळे संतोष मोहिते यांच्या हत्येचा डाव फसला.

दरम्यान, पोलिस हात धुवून मागे लागल्याचे समजल्यानंतर अनिल मोहिते आणि त्याची पिलावळ अंडरग्राउंड झाली. चालू वर्षात जोरदार कारवाई गुन्हेगारी टोळ्यांचे रेकॉर्ड अद्ययावत करून त्यांच्यावर मोका कायदाअंतर्गत कारवाई करण्याचे 07 प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यावर पोलिस उपायुक्त यांच्या अभिप्रायानंतर अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी मोका कायद्याच्या कलमांचा अंतर्भाव करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, चालू वर्षात एकूण 110 गुन्हेगारांवर मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच, एकाला कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे.

कोण आहे अनिल मोहिते ?
अनिल मोहितेवर खून, मारामार्‍या यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. लोणी काळभोर, हिंजवडी, डेक्कन, यवत, राजगड आणि वाकड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, 24 फेब्रुवारी 2021 रोजी त्याला येरवडा कारागृहात स्थानबद्धदेखील करण्यात आले होते.

पोलिस ठाणे टोळीप्रमुख व सदस्य संख्या
चिंचवड पोलिस ठाणे : अनिल तुकाराम मोहिते, व इतर 10
हिंजवडी पोलिस ठाणे : हिरा बहादूर हमाल व इतर 07
चाकण पोलिस ठाणे : शुभम सुरेश म्हस्के व इतर 17
निगडी पोलिस ठाणे : दत्ता बाबू सूर्यवंशी व इतर 03
चिंचवड पोलिस ठाणे : आकाश राजू काळे व इतर 06 –
पिंपरी पोलिस ठाणे : विशाल विष्णू लष्करे व इतर 30
तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे : कुणाल धीरज ठाकूर व इतर 29
निगडी पोलिस ठाणे : अक्षय मुकुंद गायकवाड यास एम.पी.डी.ए. अंतर्गत स्थानबध्द करण्यात आले.

Back to top button