पुणे : कोवळ्या वयातच गुन्हेगारीच्या वाटेवर जाणार्‍यांच्या पाठीवरील ’हात’ आता पोलिस शोधणार | पुढारी

पुणे : कोवळ्या वयातच गुन्हेगारीच्या वाटेवर जाणार्‍यांच्या पाठीवरील ’हात’ आता पोलिस शोधणार

पुणेः पुढारी वृत्तसेवा :  शहरातील बहुतांश कथित भाई, त्यांचे पंटर कारागृहात असताना, शहरात कोयताधार्‍यांचा धुडगूस काही केल्याने थांबत नाही. यामध्ये प्रामुख्याने अल्पवयीन (विधिसंघर्षति) मुलांचा सहभाग मोठा असल्याने ही गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी ‘मास्टर प्लॅन’ तयार केला आहे. त्यानुसार कोवळ्या वयातच गुन्हेगारीच्या वाटेवर जाणार्‍यांच्या पाठीवरील हात शोधण्याचे काम आता पोलिस करणार आहेत.

गुन्हेगारांना हिरोच्या रूपात आपला आदर्श मानणारी तरुणांची एक पिढीच समाजात निर्माण झाली आहे. ही पिढी स्वतःच्या छोट्या-मोठ्या गुन्हेगारी टोळ्या निर्माण करून परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहे. गुन्ह्यात अडकल्यानंतर बडे गुन्हेगार अशा तरुणांना अनेकदा आश्रय अन् बाहेर येण्यासाठी पैसा पुरवतात. एकदा का तो सराईत झाला की, त्याचा पुढे सोईस्कर वापर केला जातो. पुढे त्यातूनच जन्म होतो तो कथित भाई… दादा… अन् भाऊंचा…! त्यामुळे पोलिसांनी आता अल्पवयीन गुन्हेगारीला गांभीर्याने घेतले आहे.
अल्पवयीन मुलांनी गेल्या सहा महिन्यात केलेल्या गुन्ह्यांचे रेकॉर्ड काढण्याच्या सूचना पोलिस आयुक्तांनी सर्व ठाण्यांच्या प्रभारींना दिल्या आहेत. 16 ते 18 वयाच्या मुलांचा गंभीर गुन्ह्यात सहभाग आहे.

त्यामध्ये 42 गुन्हे असे आहेत की, त्यांच्यामागे कोणतीतरी ’मास्टरमाईंड’ व्यक्ती आहे. त्याने सांगितल्यानुसार अल्पवयीन मुलांनी हे गुन्हे केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याचा तपास करून पोलिस पडद्यामागील सूत्रधार शोधून काढणार आहेत.  सन 2022 मध्ये वेगवेगळ्या 303 गुन्ह्यात 476 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामध्ये गंभीर गुन्ह्यांचा आकडा मोठा आहे. मागील पाच वर्षातील हा उच्चांकी आहे. त्यामुळे अल्पवयीन गुन्हेगारीत मोठी वाढ होत असल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे शहरात घडणारे कोयत्याचे वार अन् बंदुकीतून निघणारे बारदेखील अल्पवयीन मुले काढू लागली आहेत.

खून, खुनाचा प्रयत्न, तोडफोड, गर्दी, मारामारी, दहशत निर्माण करण्याबरोबरच टोळ्यांतील वर्चस्ववाद अशा गुन्ह्यांत अल्पवयीन मुलांचा सहभाग मोठा आहे. अशातच नुकतीच येरवडा येथील रिमांडहोममधून (बालसुधारगृहातून) सात अल्पवयीन मुले भिंतीला शिडी लावून फरार झाली. त्यांना पळवून नेण्यात एका सराईत गुन्हेगाराचा हात असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर गेल्या महिन्यात गुन्हे शाखेच्या पथकाने लोणी-काळभोर परिसरातील अवैध धंद्यांवर कारवाई केली होती. त्या वेळी गुन्हेगारी टोळ्यांना तेथून रसद पुरविली जात असल्याचे दिसून आले होते. याबाबत गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रजनीश निर्माल म्हणाले, ’हडपसर परिसरात असलेल्या गुन्हेगारी टोळक्यात अल्पवयीन मुलांचा मोठा सहभाग आहे.

त्यांना काही गुन्हेगार आश्रय देत असल्याचा व त्यांच्याकडून गंभीर गुन्हे करून घेत असल्याचा संशय आहे.’ त्यानुसार पोलिस आयुक्त रितेशकुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णकि, अपर पोलिस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या सूचनेनुसार प्लॅन तयार केला असून, त्याच्या कार्यवाहीला सुरुवात केली आहे. दुसरीकडे गुन्हेगारी वाटेवर पाऊल ठेवू पाहणार्‍या मुलांचे समुपदेशन केले जात आहे.  गुन्ह्यातील अल्पवयीन मुलांच्या मागे कोणते गुन्हेगार पडद्यामागून काम करत आहेत का ? त्यांना रसद पुरविली जाते आहे का ? याचा तपास केला जातो आहे. असे 42 गुन्हे निवडण्यात आले आहेत. जे गंभीर गुन्हे आहेत त्यांना ‘निर्भया अ‍ॅक्ट’ लावण्यात येतो आहे. – रितेश कुमार, पोलिस आयुक्त पुणे शहर

Back to top button