पुणे : खंडणी मागणार्‍यांना दणका ; विमानतळ पोलिस ठाण्यात खंडणीचे तीन गुन्हे दाखल

file photo
file photo
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : एकाच दिवसात विमानतळ पोलिस ठाण्यात खंडणीखोरांवर 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी माथाडीच्या नावाखाली खंडणी उकळणार्‍यांना इशारा दिल्यानंतर हे तीन गुन्हे दाखल करत कारवाई करून दणका दिला आहे. पहिल्या प्रकरणात ट्रकमधून आलेल्यांना अडवून माथाडी संघटनेला 500 रुपये एंट्री द्यावी लागेल, अशी मागणी करणार्‍या धोंडिबा विठ्ठल राखपसरे (रा. राखपसरे वस्ती), राहुल भीमराव त्रिभुवन (रा. संजय पार्क, विमाननगर) यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार लोहगाव येथील सरस्वती एंटरप्रायजेस येथे 24 जानेवारी रोजी घडला होता.

एका बिल्डिंग सप्लायर व्यावसायिकाने विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांच्या कंपनीचा चालक व इतर तीन कामगार हे डिस्ट्रिब्युटरकडे माल पोहचविण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांचा ट्रक अडविला. माल खाली करण्यासाठी माथाडी संघटनेला 500 रुपये एंट्री द्यावी लागेल, नाही तर तुम्हाला बघून घेईल, अशी धमकी दिली होती. त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. दुसर्‍या प्रकरणात एका 36 वर्षांच्या व्यावसायिकाने विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रवी ससाणे व त्यांच्या तीन साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फिनिक्स मॉल येथे 19 ऑक्टोबर 2022 ते 23 जानेवारी 2023 दरम्यान घडला आहे.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी यांची फर्म असून, त्यांना एका कंपनीच्या फ्लोअरिंगची फरशी बसविण्याचे काम मिळाले आहे. त्यासाठी कोची येथून फरशा घेऊन ट्रक 19 ऑक्टोबर 2022 रोजी आला होता. रवी ससाणे व त्याचे साथीदार तेथे आले. त्यांनी ट्रकमधील माल खाली करण्यास हरकत घेतली. रवी ससाणे फिर्यादीला म्हणाला, 'मी येथील स्थानिक आहे. ट्रकमधील फरशी आम्हीच खाली करणार, त्यासाठी तुला 5 लाख रुपये द्यावे लागतील.' त्यावर त्यांनी 'तुम्ही माथाडी बोर्डाचे नोंदणीकृत कामगार आहात का,' असे विचारले. तेव्हा ससाणे याने 'माझी तू माहिती काढून बघ, मी तडीपार होतो. तुला या ठिकाणी गाड्या लोडिंग-अनलोडिंग करायचे असेल तर मला 5 लाख रुपये देऊन टाक. नाही तर तुला जिवंत सोडणार नाही,' अशी धमकी दिली. त्यावर फिर्यादी यांनी त्यांच्याजवळ असलेले 76 हजार रुपये दिले. त्यानंतर ते फरशा खाली न करता तसेच निघून गेले.

दुसर्‍या दिवशी त्याचे साथीदार येऊन फिर्यादी यांच्याकडून जबरदस्तीने 1 लाख 24 हजार रुपये घेऊन गेले. फिर्यादी यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात 29 नोव्हेंबर 2022 रोजी तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर 23 जानेवारी 23 रोजी त्यांचा ट्रक ससाणे याच्या लोकांनी पुन्हा अडविला. 'तुम्ही रवी मामाला ठरल्याप्रमाणे पैसे दिले नाहीत,' असे म्हणून ट्रक खाली करण्यास हरकत घेतली. तेव्हा फिर्यादी यांनी घरातून 112 क्रमांकावर फोन केला. पोलिस आल्याचे पाहून रवी ससाणेची माणसे निघून गेली. त्यानंतर आता खंडणीविरोधी पथकाने या घटनेची दखल घेतली असून, गुन्हा दाखल केला आहे.

अंडाभुर्जीची हातगाडी लावण्यासाठी दरमहा 10 हजार रुपयांची हप्त्यांची मागणी करणार्‍या अशोक चव्हाण (वय 45, रा. म्हाडा कॉलनी, विमाननगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका 35 वर्षांच्या महिलेने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांचे पती म्हाडा कॉलनीच्या बसस्टॉपजवळ अंडाभुर्जीची हातगाडी लावतात. अशोक चव्हाण हा 31 जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता तेथे गाडीवर आला. फिर्यादी यांना अंडाभुर्जीची गाडी चालू ठेवण्यासाठी दरमहा 10 हजार रुपयांची हप्त्याची मागणी केली. हप्ता न दिल्यामुळे त्याने फिर्यादींना अश्लील शिवीगाळ करून हाताने चापट मारून पतीला मारून टाकेन, अशी धमकी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news