पुणे : त्याने रचला स्वतःच्या मृत्यूचा बनाव; पण…! | पुढारी

पुणे : त्याने रचला स्वतःच्या मृत्यूचा बनाव; पण...!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : चोरी केल्यानंतर त्याने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला. एवढेच नाही, तर मध्य प्रदेशातील एका स्थानिक वर्तमानपत्रात त्याने नातेवाईकांमार्फत बातमी छापून आणली. मात्र, त्याचा हा बनाव कोथरूड पोलिसांच्या नजरेतून सुटू शकला नाही. वर्षभरापूर्वी कोथरूड भागातून मोटार चोरून पसार झालेल्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली.
तपासात चोरटा हयात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला पकडण्यात आले.  विवेक मिश्रा (रा. महेर, जि. सतना, मध्य प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. मिश्रा याचे कोथरूड भागात पंक्चरचे दुकान होते.

वर्षभरापूर्वी त्याने कोथरूड परिसरातून मोटार चोरली होती. त्याने पौड परिसरातून दुचाकी चोरली होती. चोरी करून मिश्रा मूळगावी गेला. त्याने नातेवाईकांमार्फत स्वत:च्या मृत्यूची बातमी एका वर्तमानपत्रात छापून आणली होती. मिश्रा याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना प्राथमिक तपासात मिळाली होती. त्यानंतर मध्य प्रदेशातील मिश्रा याच्या मूळगावी पोलिसांचे पथक दाखल झाले. तेव्हा त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना नातेवाईकांनी दिली. वृत्तपत्रातील मृत्यूच्या बातमीचे कात्रण त्यांनी तपास पथकाला दाखविले होते, असे कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, पोलिसांच्या तपासात मिश्रा हयात असल्याची माहिती मिळाली. तो चोरी केलेली मोटार वापरत होता. मोटारीच्या वाहन पाटीवरील क्रमांक बदलून तो पुण्यात आला असल्याची माहिती तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक माळी, दहिभाते, चौधर यांना मिळाली. त्यानंतर त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. त्याच्याकडून वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त सुहेल शर्मा, सहायक आयुक्त रुक्मिणी गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब बडे, उपनिरीक्षक माळी, चौधर, सुळ, शिर्के, राठोड, वाल्मिकी, दहिभाते, शेळके आदींनी ही कारवाई केली.

Back to top button