पुणे : ‘पिफ’मध्ये पुरस्कार मिळाल्याचा आनंद खूप मोठा ; ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांची भावना | पुढारी

पुणे : ‘पिफ’मध्ये पुरस्कार मिळाल्याचा आनंद खूप मोठा ; ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांची भावना

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  ‘मला खूप आनंद आहे की, आपण मला हा पुरस्कार दिला. ‘पिफ’मध्ये पुरस्कार मिळाल्याचा आनंद खूप मोठा आहे,’ अशी भावना ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांनी गुरुवारी व्यक्त केली. पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य सरकारच्या वतीने आयोजित 21 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी उत्साहात झाले. यानिमित्ताने महोत्सवाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात मनोजकुमार यांना ‘पिफ डिस्टिंग्विश्ड् अवॉर्ड फॉर आऊटस्टँडिंग कॉन्ट्रिब्युशन टू इंडियन सिनेमा’ हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार होता. मात्र, काही कारणास्तव ते कार्यक्रमात येऊ शकले नाहीत, त्यामुळे त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी त्यांना सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महोत्सवाच्या उद्घाटनाच्या वेळी हा पुरस्कार प्रदान करतानाचा व्हिडिओ दाखविण्यात आला. त्या व्हिडिओद्वारे संवाद साधताना मनोजकुमार बोलत होते.

मुकुंदनगर येथील थिएटर अकादमीच्या सकल ललित कलाघर येथे झालेल्या महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाला नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे, महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, कलात्मक संचालक समर नखाते, फाउंडेशनचे कोषाध्यक्ष राजेंद्र केळशीकर आणि फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. मोहन आगाशे आदी उपस्थित होते.

उद्घाटनावेळी ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक अ‍ॅण्ड साउंड’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर ज्येष्ठ संगीतकार इनॉक डॅनियल्स यांना ‘पिफ डिस्टिंग्विश्ड् अवॉर्ड फॉर आऊटस्टँडिंग कॉन्ट्रिब्युशन टू इंडियन सिनेमा’ ने गौरविण्यात आले. या वेळी मंगेशकर यांनी डॉ. पटेल यांच्यासोबत काम केलेल्या ‘जैत रे जैत ’ चित्रपटांबाबतच्या आठवणींना उजाळा देत, पुरस्काराबाबत आभार मानले.

कार्यक्रमात फिल्म एडिटर ए. श्रीकर प्रसाद आणि पोलंड येथील ज्येष्ठ चित्रपट-नाट्य दिग्दर्शक ख्रिस्तोफर झानुसी यांचा डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.  इनॉक डॅनियल्स म्हणाले, ‘संगीतात प्रामाणिकपणा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण, संगीत चूक आहे की बरोबर, हे ते न शिकलेला माणूस देखील ओळखू शकतो. त्यामुळे आपल्याला किती चांगले येते, हे आपणच ठरवले पाहिजे.’ गायक राहुल देशपांडे, गायिका प्रियंका बर्वे यांनी आपल्या सहकलाकारांसह गायन सादर केले. तर अभिनेत्री आणि नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांनी सहकलाकारांसोबत नृत्य सादर केले.

Back to top button