पिंपरी : पोटनिवडणुकीसाठी दुसर्या दिवशी दोघांचे अर्ज दाखल

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी (दि. 1) दोन इच्छुकांनी उमेदवारीअर्ज सादर केले. तर, तब्बल 20 जणांनी अर्ज नेले आहेत. अॅड. अनिल सोनावणे यांनी भारतीय रिपब्लिकन पार्टी (आरपीआय) व अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले. मिलिंद कांबळे यांनी अपक्ष म्हणून एक अर्ज सादर केला आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पोटनिवडणुक होत आहे. निवडणुकीसाठी 26 फेबु्रवारीला मतदान होणार आहे.
त्यासाठी सोमवार (दि. 31) अर्ज वाटपास सुरूवात झाली आहे. थेरगाव येथील ग क्षेत्रीय कार्यालयाच्या तिसर्या मजल्यावरील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात निवडणुकीचे कामकाज केले जात आहे. बुधवारी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत दोघांनी तीन अर्ज दाखल केले. तर, तब्बल 20 जणांकडून अर्ज नेण्यात आले. दोन दिवसांत एकूण 40 जणांनी अर्ज नेले आहेत, असे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.