चिंचवड: अजित पवारांनी मुलाखती घेण्याआधीच नाना काटेंनी घेतला अर्ज, लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीनेही घेतले नामनिर्देश पत्र | पुढारी

चिंचवड: अजित पवारांनी मुलाखती घेण्याआधीच नाना काटेंनी घेतला अर्ज, लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीनेही घेतले नामनिर्देश पत्र

पुणे, पुढारी ऑनलाईन: चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर करण्याआधीच माजी नगरसेवक नाना काटे यांनी नामनिर्देश पत्र विकत घेतलं आहे. विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी अद्याप चिंचवड विधानसभेतील इच्छुकांच्या मुलाखती घेतलेल्या नाहीत. त्या होण्याआधीच राष्ट्रवादीकडून नाना काटे यांनी अर्ज विकत घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 2014 मध्येही काटे यांनी चिंचवड विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना 42 हजार 553 मतं पडली होती. ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे. पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने एकमुखाने हा निर्णय घेतला होता. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यासमोर निवडणूक लढण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यानंतर चिंचवड शहरातील काही नावांची जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्या नावांमध्ये नाना काटे यांचंदेखील नाव होतं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने पोटनिवडणुकीबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट करण्याआधीच माजी नगरसेवक नाना काटे अर्ज विकत घेतला आहे.

अश्विनी जगताप यांनी घेतला अर्ज

भाजपकडून चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडुकीत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप की त्यांचे लहान बंधू शंकर जगताप यापैकी कोणाला उमेदवारी मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अशातच गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगताप कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यानंतर आज लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी नामनिर्देश पत्र विकत घेतले आहे. त्यामुळे चिंचवडमध्ये भाजपच्या त्या उमेदवार असतील अशी चर्चा शहरात सुरु झाली आहे

Back to top button