पुणे : अखंड हिंदुस्थान, हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आवश्यक : संभाजी भिडे गुरुजी | पुढारी

पुणे : अखंड हिंदुस्थान, हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आवश्यक : संभाजी भिडे गुरुजी

जुन्नर : पुढारी वृत्तसेवा :  हिंदवी स्वराज्य हा जीवनाचा मार्ग शहाजीराजांनी छत्रपती शिवाजीराजांना दाखविला. त्यानुसार छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हिंदूंनी जगावे कसे हे दाखवून देत धर्म संस्थापनेचे काम त्यांनी केले. अखंड हिंदुस्थान, हिंदू धर्म, हिंदू संस्कृती ही सध्याची आवश्यकता असल्याचे विचार शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरुजी यांनी जुन्नरमध्ये
व्यक्त केले.  श्री क्षेत्र भीमाशंकर ते शिवनेरी धारातीर्थ यात्रा मोहिमेची सांगता शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नरमधील बुट्टे पाटील विद्यालयाच्या पटांगणामध्ये जाहीर सभेने झाली. या वेळी मोठ्या संख्येने सहभागी धारकर्‍यांना मार्गदर्शन करताना भिडे गुरुजी बोलत होते.
आमदार शिवेंद्रराजे भोसले, महेश लांडगे, माजी आमदार शरद सोनवणे, आशा बुचके, उद्योजक संजय मालपाणी, भावेश भाटिया, नीलकंठेश्वर स्वामी, रावसाहेब देसाई, धनंजय देसाई आदींसह बेळगाव, आंध—प्रदेश, कर्नाटक या राज्यांसह राज्यभरातील धारकरी तसेच शिवपाईक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संभाजी भिडे गुरुजी म्हणाले, हिंदू म्हणून जगायचे असेल, तर धर्मवीर संभाजीराजांच्या जीवनाचा आदर्श प्रत्येकासमोर पाहिजे. हिंदू समाज भारतमातेच्या रूपाने जगवायचा असेल, तर धर्मवीर बलिदान मास हा प्रत्येक गावात पाळलाच गेला पाहिजे. राज्यातील 38 जिल्ह्यांत 38 हजारांपेक्षा अधिक ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील प्रत्येक गावात 21 फेब—ुवारी ते 23 मार्च या कालावधीत धर्मवीर बलिदान मास प्रखरपणे पाळला जाणे आहे. या कालावधीत गोड न खाणे, शुभकार्य न करणे, शुभकार्याला न जाणे, सुतक पाळणे, गादीवर न झोपणे या बाबी पाळल्याच पाहिजेत, असेही आवाहन त्यांनी या वेळी केले.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून प्रेरणेतून बलशाली युवा पिढी राज्यामध्ये सध्या घडविली जात असून, देश घडविण्याचे तसेच समाज घडविण्याचे काम ही पिढी करीत आहे. चांगल्या आदर्श विचारांची शिदोरी युवा पिढीला या माध्यमातून मिळत असल्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी या वेळी सांगितले. भीमाशंकर ते शिवनेरी धारातीर्थ मोहिमेची सांगता बुधवारी शिवनेरी गडावर झाली. या वेळी गडापासून शिवप्रभू दौड काढण्यात आली होती. जुन्नरमधील पाच रस्ता चौक, परदेशपुरा, सराई पेठ, रविवार पेठ, कल्याण पेठ येथे या दौडचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात, फुलांची उधळण करीत, रांगोळ्या घालून मोठ्या उत्साहामध्ये शहरातील नागरिकांनी केले. फटाक्यांच्या आतषबाजीत व तोफांची सलामी देत या दौडमधील सहभागी 60 हजारांपेक्षा अधिक धारकऱ्यांचे स्वागत शहरातील नागरिकांनी मोठ्या उत्साही व आनंदी वातावरणात केले

Back to top button