पुणे : पाण्यासाठी वन्यप्राण्यांची भटकंती ; वनीकरणातील टाक्या पडल्या कोरड्याठाक | पुढारी

पुणे : पाण्यासाठी वन्यप्राण्यांची भटकंती ; वनीकरणातील टाक्या पडल्या कोरड्याठाक

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा :  इंदापूर तालुक्यातील वनीकरणातील कृत्रिम व नैसर्गिक पाणवठ्यातील पाण्याने तळ गाठून त्या कोरड्याठाक पडल्या आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांना आपली तहान भागविण्यासाठी पाण्याच्या शोधात वणवण भटकंती करावी लागत आहे. वनीकरणातील या पाणवठ्यात तातडीने पाणी सोडण्याची मागणी फ—ेंड्स ऑफ नेचर क्लबच्या सदस्यांनी केली आहे.  तालुक्यातील वनीकरणात प्रसिद्ध चिंकारा जातीच्या हरणांची संख्या जास्तीची असून लांडगे, खोकड, तरस, रानटी ससे, मुंगूस, घोरपड, साळिंदर, विविध जातींचे साप, पिवळ्या पायाची माळ टिटवी, धाविक पक्षी, सर्पमार गरुड, नराछ गरुड, ससाणे यांसह हजारो कृमी, कीटक आढळतात. तसेच येथे विविध देशी-विदेशी वृक्षसंपदा उपलब्ध असून, इतर पशुपक्ष्यांचा देखील मोठ्या प्रमाणात अधिवास आहे.

कडबनवाडी, कळस, कौठळी, गोखळी, व्याहाळी, सोनमाथा परिसरात डोंगरभाग जास्त असल्याने या परिसरात उष्णतेचे प्रमाण नेहमीच जास्त असते. त्यामुळे या भागात पाण्याची समस्या सतावत असते. त्यामुळे वन विभागाने वनीकरणातील कृत्रिम पाणवठ्यात पाणी सोडावे, अशी मागणी करण्यात आली आहे. वैभव जाधव, अ‍ॅड. सचिन राऊत, राहुल लोणकर, अ‍ॅड. श्रीकांत करे, अर्जुन जाधव, अ‍ॅड. संदीप शेंडे, आशिष हुंबरे, विकी जगताप, अमोल हेमाडे आदींनी ही मागणी केली आहे.

Back to top button