शिर्डी : साईभक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या ; गिरधर स्वामीसह दोघांवर गुन्हा दाखल | पुढारी

शिर्डी : साईभक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या ; गिरधर स्वामीसह दोघांवर गुन्हा दाखल

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा : समाज माध्यमावर साईबाबांविषयी बदनामीकारक खोटे वक्तव्य करून असंख्य साईभक्तांचे धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणावरून हैदराबाद येथील गिरधर स्वामीसह अन्य दोघांवर शिर्डीच्या पोलीस ठाण्यात धार्मिक तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी साईभक्तांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. साईभक्त शिवाजी अमृतराव गोंदकर यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार शिवाजी गोंदकर यांच्या मोबाईलवर 31 जानेवारी रोजी 12 वाजेच्या सुमारास युट्युब या माध्यमावर साईबाबा विषयी बदनामीकारक खोटे वक्तव्य करण्यात आले होते. ते वक्तव्य गिरधर स्वामी, हिरालाल श्रीनिवास काबरा (रा. हैदराबाद), व्हिडिओ काढणारा अज्ञात इसम अशा तिघांनी हा संमंधीत बदनामीकारक मजकूर प्रसारित केला होता. यातून तक्रारदार यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या होत्या.

गिरधर स्वामी यांनी हिंदु मुस्लिम धर्मात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य असलेला व्हिडीओ युट्युब या माध्यमावर प्रसारित केला आहे. यावरून त्या तिघांवर धार्मिक तेढ निर्माण केल्याचा व साईबाबविषयी बदनामीकारक वक्तव्य प्रसारित केल्याचा गुन्हा शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक कोकाटे करीत आहे.

संवेदनशील गुन्हा असून पोलीस सायबर क्राईमचे मार्गदर्शन घेऊन युट्युबवर ‘तो’ कार्यक्रम कुठे झाला, कुठून हा व्हिडीओ टाकण्यात आला आहे, याची खातरजमा करून पुढील तपास करू. आरोपींना अटक केली जाईल.
                                                – गुलाबराव पाटील, पोलिस निरीक्षक, शिर्डी

Back to top button