पुणे : पालखी मार्गावरील खडीमुळे अपघाताचा धोका | पुढारी

पुणे : पालखी मार्गावरील खडीमुळे अपघाताचा धोका

बावडा : पुढारी वृत्तसेवा : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर बावडा-इंदापूर दरम्यान रामवाडी, शेटफळ पाटी परिसरातील डांबरी रस्त्यावर आलेल्या खडीमुळे दुचाकी वाहने घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे डांबरी रस्त्यावर खडी न येण्याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, अशी मागणी दुचाकीस्वारांकडून करण्यात येत आहे. सध्या पालखी मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम सुरू असताना वाहनचालकांच्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे आहे. सोमवार (दि. 30) व मंगळवारी (दि. 31) रामवाडी, शेटफळ पाटी परिसरात डांबरी रस्त्यावर खडी आल्याने दुचाकी वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

रामवाडी येथे मंगळवारी सकाळी रस्त्यावर आलेली खडी रात्रीपर्यंत आणखी जास्त पसरलेली दिसून आली, त्यामुळे दुचाकीचालकांची अचानकपणे खडी दिसल्यावर वेग आवरताना त्रेधातिरपीट उडताना दिसत होती. तसेच सध्या अनेक वेळा डांबरी रस्त्यांवर खडीचे दगड दिसून येत आहेत, त्यामुळे रात्रीच्या वेळी दुचाकी वाहनांना अपघाताचा धोका निर्माण होत आहे. पालखी मार्गाचे काम सुरू झाल्यापासून आजपर्यंत अनेक दुचाकी वाहनांना अपघात होऊन दुचाकीस्वारांना गंभीर इजा झाल्या आहेत.

त्यामुळे सध्या काम सुरू असल्याने पालखीमार्गावरून प्रवास करताना दुचाकीस्वारांनी काळजी घ्यावी, वाहने सावकाश चालवावीत, असे आवाहन माजी उपसरपंच सदानंद कोरटकर (वकीलवस्ती), पांडुरंग शिर्के (वडापुरी) यांनी केले आहे. पालखी मार्गावर सध्या ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरचालकांना चढ-उताराच्या ठिकाणी तारेवरची कसरत करावी लागत आहे. एकंदरीत, प्रवासी व परिसरातील नागरिक हे पालखीमार्गाचे काम लवकर पूर्ण व्हावे या प्रतीक्षेत आहेत.

Back to top button