पुणे : ओतुरला सद्गुरु भेट पायी दिंडी सोहळ्याचे दिमाखदार स्वागत | पुढारी

पुणे : ओतुरला सद्गुरु भेट पायी दिंडी सोहळ्याचे दिमाखदार स्वागत

ओतूर : पुढारी वृत्तसेवा : चिदंबर सेवा समिती व श्री संत तुकाराम महाराज देहू संस्थान यांच्या संयुक्त श्री क्षेत्र देहू ते श्री क्षेत्र lओतूर (ता. जुन्नर) पायी दिंडी सोहळ्याचे ओतुर नगरीत दिमाखदार स्वागत करण्यात आले. संत तुकाराम महाराजांचे गुरु सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज यांची संजीवन समाधी मंदिर ओतूर येथे आहे. बाबाजी चैतन्य महाराजांच्या भेटीसाठी तसेच दर्शन लाभ आणि पावशेर तुपाची संकल्पना घेऊन या पायी दिंडी सोहळ्याचे भव्यदिव्य आयोजन दरवर्षी केले जात असते.

शनिवारी (दि. २८) देहु येथून हा पायी दिंडी सोहळा प्रारंभ होऊन मंगळवारी (दि. ३१) श्री क्षेत्र ओतुरनगरीत पोहचला. तत्तपूर्वी या सोहळ्याचे विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समिती नारायणगाव येथे शानदार रिंगण पार पडला. श्री क्षेत्र ओझरच्या विघ्नहराचे दर्शन घेऊन मंगळवारी ओतूर शहरात फटाक्यांच्या आतिशबाजीत स्वागत करण्यात आले. यावेळी हजारो नागरिक सोहळयात सहभागी झाले, टाळ, मृदुंग आणि सुमधुर अभंगाच्या तसेच ‘रामकृष्ण हरि’च्या गजराने अवघा परिसर दुमदुमुन गेला. ओतुर बाजारपेठेतील संत तुकाराम महाराज यांचे जानू तेल्याच्या बखळीतील स्वप्नदृष्टान्त मंदिराचे प्रांगणात एक अभंग होऊन संत तुकारामांच्या अनुग्रह मंदिराकडे हा सोहळा मार्गस्थ झाला.

माघ शुद्ध दशमीच्या पर्वावर अनुग्रह दिनानिमित्त बाबाजी चैतन्य महाराज व संत तुकाराम महाराज भेट झालेले अनुग्रह मंदिर प्रांगणात सोहळा पोहचला त्यावेळी हजारो वारकरी नतमस्तक होऊन ‘भोजना मागती तूप पावशेर’ घेऊन बाबाजी चैतन्य महाराज संजीवन समाधीस्थळी हज़ारोंच्या उपस्थितीत विधिवत महाअभिषेक करण्यात आला. हरिनाम सप्ताहाचे हभप प्रशांत महाराज मोरे (देहू) यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळयाची सांगता झाली.

देहुचे रामदास मोरे, राजू भसे, महेश हांडे यांनी आयोजन केलेल्या या सोहळयाचे स्वागत कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे, शिवसेना जिल्हा समन्वयक संभाजी तांबे, ग्रा.पं सदस्य आशिष शहा, मांडवी किनारा पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप बोचरे, राम घाटकर परिवार, जय बजरंग गणेश मंडळ, ओतुर ग्रामपंचायत, ओतुर किराणा व्यापारी असोशिएशन, जेष्ठ नागरिक संघ व ओतुरवासियानी स्वागत केले. तसेच अजित कर्डिले, संतोष तांबे, संजय शेटे यांच्यावतीने करण्यात आलेल्या अन्नदान महाप्रसादाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घेतला.

Back to top button