पुणे : ‘धूमस्टाईल’ने महिलांचे दागिने हिसकावणार्‍या टोळीला बेड्या | पुढारी

पुणे : ‘धूमस्टाईल’ने महिलांचे दागिने हिसकावणार्‍या टोळीला बेड्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दुचाकीवर येऊन धूमस्टाईलने महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकाविणार्‍या टोळीच्या सिंहगड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडील तपासात 10 सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. पोलिसांनी 13 तोळे सोन्याचे दागिने, महागडी दुचाकी, असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली भिकाजी चव्हाण (वय 20, रा. देवाची उरुळी, मंतरवाडी), राजू महादेव डेंगळे (वय 19, रा. प्रतीनगर, कात्रज-कोंढवा रोड), गजानन दत्तात्रय बोर्‍हाडे (वय 30, रा. हिवरकर मळा, सासवड) अशी अटक केलेल्या टोळीतील तिघांची नावे आहेत.

मंगळसूत्र हिसकावून नेणारे आरोपी सनसिटी रोड भागात येणार असल्याबाबत माहिती पोलिस अंमलदार राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर, अमोल पाटील यांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक जयंत राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन निकम यांच्या पथकाने सापळा रचून ज्ञानेश्वर चव्हाण आणि राजू डेंगळे यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी 3 जानेवारीला धायरी परिसरातून जाणार्‍या महिलेची सोनसाखळी हिसकावून नेल्याची कबुली दिली. त्यांचा साथीदार गजानन यानेही शहरातील विविध ठिकाणी सोनसाखळ्यांची चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले.

पोलिस निरीक्षक जयंत राजूरकर, सहायक पोलिस निरीक्षक सचिन निकम, गणेश मोकाशी, उपनिरीक्षक आबा उत्तेकर, संजय शिंदे, धनंजय शेटे, सुनील साळुंखे, शिवाजी क्षीरसागर, अविनाश कोडे यांच्या पथकाने कामगिरी केली.

Back to top button