पुणे : …अन् ते झाले औट घटिकेचे अधीक्षक | पुढारी

पुणे : ...अन् ते झाले औट घटिकेचे अधीक्षक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कृषी खात्यातील अजब कारभाराचा उत्तम नमुना मंगळवारी (दि. 31) पुन्हा एकदा समोर आला असून, एका कृषी उपसंचालकांच्या सेवानिवृत्तीच्या आधी एक तास त्यांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीपदी पदोन्नतीचा आदेश मंत्रालयातून आला. पदोन्नती व सेवानिवृत्ती एकाच दिवशी आल्याने बढत्यांबाबत मंत्रालयस्तरावरील अनास्थेबद्दल कृषी विभागात तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. जुलै महिन्यापासून महाराष्ट्र कृषी सेवा, गट ’अ’ वर्गातील 81 कृषी उपसंचालकांच्या, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांच्या बढत्यांचा प्रस्ताव मंत्रालयस्तरावर धूळ खात पडला आहे. त्यावर एकाचवेळी शिक्कामोर्तब करून पदोन्नत्या देणे टाळले जात असल्याचे यानिमित्त पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

कृषी आयुक्तालय कक्षातील कृषी उपसंचालक शिरीषकुमार विठ्ठल जाधव यांची 31 जानेवारी रोजी सेवानिवृत्ती होती. त्यानुसार कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सोमवारीच सत्कार केला होता. तसेच मंगळवारी दिवसभर अधिकारी, कर्मचार्‍यांकडूनही त्यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देण्याचे काम सुरूच होते. अशातच सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांच्या बढतीचा आदेश आला. त्याचेही अभिनंदन सुरू राहिले आणि त्यांची बढती बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प तथा स्मार्ट प्रकल्पामध्ये रिक्त असलेल्या वरिष्ठ कृषिमूल्य साखळीतज्ज्ञ म्हणून करण्याचे आदेश 31 जानेवारी रोजीच शासनाचे सहसचिव सरिता बांदेकर-देशमुख यांनी जारी केले.

त्यानुसार कृषी आयुक्तालयातील पदभार सोडून धावपळ करीत त्यांनी पदोन्नतीचा पदभार थोड्या वेळासाठी का होईना घेण्यासाठी स्मार्ट प्रकल्पाचे कार्यालय गाठले. त्या ठिकाणी त्यांनी पदभार स्वीकारला आणि सेवानिवृत्तीचे सोपस्कारही पार पडले. कृषी आयुक्तालयाच्या मूळ प्रस्तावातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या पदावर आत्तापर्यंत तीन अधिकार्‍यांना बढती मिळाली. मात्र, उर्वरित अधिकार्‍यांच्या बढत्यांबाबतचा कोणताच निर्णय मंत्रालयस्तरावरून घेतला जात नसल्याने कृषी विभागाचे प्रशासनही हतबल झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कृषी मंत्रालयात पडून असलेल्या बढत्यांच्या प्रस्तावावरील अंतिम निर्णय केव्हा होणार, याकडे संबंधित डोळे लावून बसले आहेत.

Back to top button