

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) कोवीड काळामध्ये पीएम केअर अंतर्गत उपलब्ध झालेले 45 व्हेंटिलेटर सध्या नादुरुस्त आहेत. या व्हेंटिलेटरची दुरुस्ती झाल्यास गरजेनुसार रुग्णांना सुविधा देणे शक्य होणार आहे. वायसीएम रुग्णालयात सध्या 3 अतिदक्षता विभाग आहे. त्यामध्ये 45 खाटा आहेत. तर, नवजात बालकांसाठी असलेल्या एनआयसीयूमध्ये 25 खाटांची सोय केलेली आहे. रुग्णालयाकडे सध्या स्वतःचे एकूण 55 व्हेंटिलेटर आहेत. ते चालु स्थितीत आहे. त्याशिवाय, कोरोनाच्या कालखंडात पीएम केअर अंतर्गत 60 व्हेंटिलेटर आले होते. केंद्र सरकारने राज्य शासनामार्फत समन्वय साधुन रुग्णालयाला हे व्हेंटिलेटर दिले होते. त्यातील 15 व्हेंटिलेटर पुण्यातील ससुन रुग्णालयाला देण्यात आले. तर, सध्या शिल्लक असलेले 45 व्हेंटिलेटर नादुरुस्त झाल्याने बंद स्थितीत आहेत.
पीएम केअर अंतर्गत प्राप्त व्हेंटिलेटरचे दर सहा महिन्याने पल्स फ्लोमीटर आणि ऑक्सिजन सेन्सर बदलण्याची गरज आहे. या व्हेंटिलेटरच्या पुरवठादार कंपनीशी याबाबत संपर्क साधण्यात आला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने या व्हेंटिलेटरची दुरुस्ती होऊ शकलेली नाही, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली.
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात सध्या अतिदक्षता विभाग आणि एनआयसीयू अंतर्गत 70 बेड आहेत. दोन बेडमागे किमान एक याप्रमाणे 35 व्हेंटीलेटर लागतात. महापालिका प्रशासनाने घेतलेले 55 व्हेंटीलेटर रुग्णालयाकडे आहेत. ते पुरेसे आहे. कोरोना काळात पीएम केअर अंतर्गत प्राप्त 45 व्हेंटीलेटरची दुरुस्ती झाल्यास गरज लागल्यावर हे व्हेंटीलेटरच लगेच उपलब्ध होऊ शकतात.
– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय पदव्युत्तर संस्था.