पुणे : भाजपचे इच्छुक मुंबईला, कॉँग्रेसच्या इच्छुकांच्या श्रीनगरहून मुलाखती | पुढारी

पुणे : भाजपचे इच्छुक मुंबईला, कॉँग्रेसच्या इच्छुकांच्या श्रीनगरहून मुलाखती

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  भाजपच्या इच्छुकांनी मुंबईला प्रदेशातील नेत्यांना भेटण्यास धाव घेतली आहे, तर काँग्रेसच्या निरीक्षकांनी थेट बर्फवृष्टी सुरू असलेल्या श्रीनगरहून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पुण्यातील काँग्रेसभवनात इच्छुकांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसने इच्छुकांची बैठक घेतली. सर्वच पक्षांमध्ये उमेदवारांच्या निवडीने वेग धरला असून, पुण्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

भाजपतर्फे कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी मागणारे हेमंत रासने, शैलेश टिळक, धीरज घाटे, कुणाल टिळक यांनी मंगळवारी मुंबईत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भेटीगाठी घेतल्या. भाजपचा उमेदवार येत्या दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता असल्याने पक्षातील सूत्रांनी सांगितले. प्रत्येक इच्छुकाने उमेदवारी आपल्यालाच मिळेल, असा दावा केला आहे.

मात्र, पक्षातर्फे निर्णय अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान, लोकप्रतिनिधीच्या निधनानंतर सर्वसंमतीने पोटनिवडणूक बिनविरोध होते. ही परंपरा कायम राखत पोटनिवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना केले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह पुण्यातील सर्व पक्षांच्या शहराध्यक्षांना पत्र लिहून मुळीक यांनी हे आवाहन केले आहे.

काँग्रेसचेे नेते राहुल गांधी यांच्या ’भारत जोडो यात्रे’च्या समारोपासाठी पुण्यातील नेते काश्मीरमध्ये श्रीनगरला गेले आहेत. तेथे बर्फवृष्टी सुरू झाल्याने ते तेथेच अडकून पडले आहेत. कसबा पेठ निवडणुकीसाठी आमदार संग्राम थोपटे हे निरीक्षक आहेत. त्यांनी तेथून पुण्यातील इच्छुक उमेदवारांशी संपर्क साधला. काँग्रेसभवनमध्ये पक्षाच्या आयटी विभागातील कार्यकर्त्यांनी या मुलाखती घडवून आणल्या.
काँग्रेसतर्फे बाळासाहेब दाभेकर, रवींद्र धंगेकर, कमल व्यवहारे, नीता रजपूत यांच्यासह दहा-बारा इच्छुकांनी या माध्यमातून त्यांची भूमिका सांगितली. शहराध्यक्ष अरविंद शिंदे, संगीता तिवारी हे श्रानगरमध्येच आहेत. थोपटे यांच्यासोबत शिंदे हेही उपस्थित होते. गोपाळ तिवारी यांना काँग्रेसभवनमध्ये मुलाखतीसाठी निमंत्रण नव्हते.

त्यांनी थेट थोपटे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांचेही म्हणणे थोपटे यांनी ऐकून घेतले. काँग्रेसमधून सोळाजणांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अंकुश काकडे, रूपाली पाटील-ठोंबरे, रवींद्र माळवदकर, वनराज आंदेकर, अण्णा थोरात, शिल्पा भोसले यांची नावे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाचे नेते अजित पवार यांच्याकडे पाठविली आहेत. पक्षाच्या सर्व इच्छुकांची आज पक्ष कार्यालयात बैठक घेण्यात आली.

त्यानंतर ही नावे पाठविण्यात आल्याचे जगताप यांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या प्रदेशातील नेत्यांची बैठक येत्या दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या येथील कार्यकर्त्यांनीही त्यांच्या नेत्यांकडे कसबा पेठ निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची
परवानगी मागितली आहे. मात्र, महाविकास आघाडीचे नेते दोन्ही पोटनिवडणुकांसंदर्भात निर्णय घेतील. ती जागा ज्या पक्षाला देण्यात येईल, त्या पक्षातर्फे उमेदवाराची निवड करण्यात येईल, असे तिन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले. .

Back to top button