पुणे : सहकारी, खासगी डेअर्‍यांकडून आजपासून दूध दरवाढ | पुढारी

पुणे : सहकारी, खासगी डेअर्‍यांकडून आजपासून दूध दरवाढ

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात गायीच्या दूध खरेदीची स्पर्धा अधिक  झाली आहे. त्यातून आता सहकारी व खासगी दूध डेअर्‍यांनी गायीच्या दुधाच्या खरेदी दरात लिटरला एक ते दोन रुपये आणि विक्री दरात प्रतिलिटरला दोन रुपये वाढ करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला आहे.  गायीच्या 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ गुणप्रतिच्या दुधाचा खरेदी दर प्रति लिटरला एक ते दोन रुपयांनी वाढवून तो 37 ते 38 रुपये आणि विक्रीचा दर प्रति लिटरला 54 वरुन 56 रुपये करण्यावर राज्य दुध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

तसेच या निर्णयाची अंमलबजावणी 1 फेब्रुवारीपासून करण्यात येणार आहे. दूधाच्या खरेदी-विक्री दरवाढीच्या निर्णयासाठी दूध कल्याणकारी संघाची मंगळवारी ( दि.31) सायंकाळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यस्तरीय बैठक झाली. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के हे होते. त्यामध्ये हा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. बैठकीस राज्यातील प्रमुख सहकारी व खाजगी 22 दूध ब्रॅंडच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. सध्या दूध खरेदी दर व अन्य पॅकिंग, ट्रान्स्पोर्टमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे पाऊच पॅकिंगमधील दूधाची दरवाढ करणे क्रमप्राप्त आहे. भविष्यात जर महाराष्ट्रातील डेअरी व्यावसायिकांना बाजारपेठेत त्यांच्या दूध ब्रॅंडची पाऊच विक्री टिकवायची असेल दर वाढवावेच लागतील अशी चर्चा बैठकीत झाली आणि त्यावर एकमत होऊन दूध विक्री दर दोन रुपयांनी वाढविण्याचा निर्णय झाल्याची माहिती कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के आणि मानद सचिव प्रकाश कुतवळ यांनी दिली.

 

Back to top button