पुणे: खिशातील पैसे काढण्यास विरोध केल्याने डोक्यात फोडली बिअरची बाटली, खुनाचा प्रयत्न करणार्‍या तिघांना बेड्या | पुढारी

पुणे: खिशातील पैसे काढण्यास विरोध केल्याने डोक्यात फोडली बिअरची बाटली, खुनाचा प्रयत्न करणार्‍या तिघांना बेड्या

पुणे, पुढारी वृत्तसेवा: खिशातून पैसे काढण्यास विरोध केल्याने बिअरची बाटली डोक्यात फोडून तरूणाच्या खुनाचा प्रयत्न करणार्‍या तिघांना वारजे माळवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सौरभ पवार, राहुल चव्हाण, कुमार चव्हाण (तिघेही रा. गोसावी वस्त, कर्वेनगर) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत तुषार ज्ञानदेव घनवटे (23, रा. इंगळे कॉम्प्लेक्स, उत्तमनगर) हे तिघांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झाले असून त्यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तुषार घनवटे आणि त्याचा मित्र अमित हे कर्वेनगर येथील मावळे आळी येथून मावशीच्या घरी बोळातून जात असताना आरोपींनी त्यांना आडवले. तुषार यांना अडविल्यानंतर त्यांनी जबरदस्तीने त्यांच्या खिशातील 960 रूपये काढून घेतले. पैसे काढून घेत असताना त्यांनी विरोध केल्याने संशयीत आरोपी राहुल चव्हाण याने त्याच्या हातील बिअरची बाटली तुषार यांच्या डोक्यात फोडून त्यांना गंभीर जखमी करत त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. हा सर्व प्रकार 30 तारखेला पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी वारजे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पुढील तपास वारजे माळवाडी पोलिस करत आहे.

Back to top button