'पप्पांनी आईचे केस धरून तिला खूप मारले', आठ वर्षाच्या मुलाने पोलिसांना सांगितले आईच्या खुनाचे कारण

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पोलिसांनी आठ वर्षाच्या मुलाला आईला काय झाले, अशी विचारणा करताच पप्पांनी आईचे केस धरून तिला खूप मारले असल्य सांगितले. त्यानंतर त्याच्याकडे केलेल्या चौकशीत खुनाचा गुन्हा उघड झाला आहे. दरम्यान जेवायला दिले नाही, दारू पिल्याने पत्नीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार बिबवेवाडी येथील अप्पर इंदिरानगर येथे 30 जानेवारी रोजी पहाटे घडला. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. परशुराम उदडंप्पा जोगन (38, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे पतीचे नाव आहे. सविता संदीप औचिते (32) यांचा पतीने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. याबाबत गणेश दत्तात्रय शिंदे (33, रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी परशुराम जोगन हा रिक्षा चालक आहे. तर सविता औचिते या परशुरामची दुसरी पत्नी होत्या. तर परशुरामही त्यांचा दुसरा पती होता. परशुराम हा गणेश शिंदे यांची रिक्षा शिफ्टने घेऊन चालवत होता. 29 जानेवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास परशुराम हा शिंदे यांच्याकडून नेहमीप्रमाणे व्यावसायासाठी रिक्षा घेऊन गेला. दरम्यान 30 तारखेच्या रात्री दोन वाजता परशुराम यांनी शिंदे यांना फोन करून बायको बाथरूमध्ये पडून तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्याला शिंदे यांनी लगेच पोलिस चौकीत जाऊन सांग, असे म्हटल्यानंतर परशुरामने पत्नीला जेवायला दिले नाही म्हणून तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचे सांगितले.
पावणे पाच वाजण्याच्या सुमारास परशुराम याने फोन करून तुमची रिक्षा घराजवळ लावली असल्याचे सांगितले. त्यावर शिंदे यांनी तू चौकीला लगेचच जा आणि काय घडलं ते खरंखरं सांग, असे म्हणाले. त्यानंतर शिंदे यांना बिबवेवाडी पोलिस ठाण्यात बोलविण्यात आले. त्यानंतर ते तिथे गेल्यावर पोलिसांबरोबर ते परशुराम यांच्या घरी गेले असता परशुरामची पत्नी त्यांना बेशुध्द अवस्थेत पडलेली दिसली. त्यावेळी आठ वर्षाच्या मुलाला तुझ्या आईला काय झाले,असे विचारण्यात आले. त्यावर मुलाने सांगितले की, रात्री पप्पांनी आईचे केस धरून आईला खूप मारले. त्यानंतर पोलिसांनी तिला ससून रूग्णालयात पुढील कार्यवाहीसाठी पाठवले. तेथे डॉक्टरांनी ती मृत पावल्याचे घोषीत केले. दरम्यान, पत्नीचा खून केल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास गुन्हे निरीक्षक अनिता हिवरकर हिवरकर करत आहे.