पक्षाचं काही ठरेना, प्रशासनाचं मात्र ठरलं! कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरु | पुढारी

पक्षाचं काही ठरेना, प्रशासनाचं मात्र ठरलं! कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरु

पुढारी ऑनलाईन: पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवार ३१ जानेवारी पासून सुरू होणार आहे. अद्याप प्रमुख पक्षांनी या दोन्ही मतदारसंघांमध्ये उमेदवार निश्चित केलेला नाही.

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा पेठ, तर आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. ३१ जानेवारी रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस ७ फेब्रुवारी आहे. प्राप्त झालेल्या उमेदवार अर्जांची छाननी ८ फेब्रुवारीला होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस १० फेब्रुवारी हा आहे. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून मतमोजणी २ मार्चला होणार आहे.

दरम्यान, कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे शहर प्रांत अधिकारी संतोषकुमार देशमुख हे काम पाहणार आहेत. उमेदवारी अर्ज गणेश कला क्रीडा मंच येथे स्वीकारले जाणार आहेत, तर चिंचवड विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज थेरगाव येथील ग-क्षेत्रीय कार्यालयात स्वीकारले जाणार आहेत. या मतदारसंघासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपायुक्त सचिन ढोले यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असे पुणे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Back to top button